देशातील औद्योगिक उत्पादनातील वाढीचा दर सरलेल्या ऑगस्ट महिन्यात ४ टक्क्यांवर आला आहे. खाण क्षेत्राची चांगल्या कामगिरीमुळे उत्पादनात वाढ झाल्याचे सरकारने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले. तथापि आधीचा जुलै महिना आणि वार्षिक तुलनेतही देशाच्या कारखानदारी क्षेत्राच्या कामगिरीचा हा निदर्शक घसरण दर्शविणारा आहे.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट कालावधीत औद्योगिक उत्पादनातील वाढीचा दर हा गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत कमी नोंदविला गेला आहे. यंदाच्या पाच महिन्यांत त्याचे प्रमाण अवघे २.८ टक्के आहे, तर गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंतच्या पाच महिन्यांत तो ४.३ टक्के होता. शिवाय औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) यावर्षी जुलै महिन्यात ३.५ टक्के नोंदविण्यात आला होता. नंतर त्यात सुधारणा करून तो ४.३ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. त्या तुलनेत ऑगस्टमध्ये तो कमी होऊन ४ टक्क्यांवर आला आहे.

ऑगस्टमध्ये खाण उद्योगाची वाढ ६ टक्के राहिली असून, त्या परिणामी औद्योगिक उत्पादनात वाढ दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये खाण उद्योगाची वाढ ४.३ टक्क्यांनी कमी झाली होती, अशी माहिती राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिली.

औद्योगिक उत्पादनात निर्मिती क्षेत्राचा वाटा तीन चतुर्थांशपेक्षा जास्त असतो. निर्मिती क्षेत्राची वाढ यंदा ऑगस्टमध्ये ३.८ टक्के आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ती १.२ टक्के होती. मूलभूत धातूंच्या उत्पादनात १२.२ टक्के आणि वाहने, ट्रेलर व सेमी-ट्रेलरच्या उत्पादनात ९.८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. वीज क्षेत्रातही ऑगस्टमध्ये ४.१ टक्के वाढ झाली आहे, असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जाहीर आकडेवारी दर्शविते. याच आकडेवारीनुसार, वीजनिर्मिती क्षेत्रातील वाढ गेल्या वर्षी म्हणजेच ऑगस्ट २०२४ मध्ये ३.७ टक्क्यांवर होती, तर ती यंदा ४.१ टक्के पातळीवर होती.

नजीकच्या भविष्यासंबंधी सुसंकेत

सरकारने औद्योगिक उत्पादनाची जुलैची सुधारित आकडेवारी जाहीर केल्याने ऑगस्टमधील वाढीचा दर घसल्याचे दिसून येत आहे. निर्मिती क्षेत्रातील घसऱणीचा परिणाम यात प्रामुख्याने मोठा वाटा आहे. निर्मिती क्षेत्राचा वाढीचा दर जुलैमध्ये ६ टक्के होता, तो ऑगस्टमध्ये ३.८ टक्क्यांवर आला आहे. त्या उलट खाण उत्पादनात चार महिन्यांच्या अंतरानंतर वर्षागणिक वाढ दिसून आली, तर वीज निर्मिती क्षेत्रातील वाढ पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली. मात्र नजीकच्या भविष्यासंबंधी चांगले संकेत आहेत. मुख्यत्वे जीएसटी कपातीमुळे आणि सणासुदीच्या काळात मागणीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे सप्टेंबर, ऑक्टोबर या महिने उत्पादनवाढीसाठी आणि एकंदर निर्मिती क्षेत्रासाठी चांगले राहण्याची शक्यता आहे, असे ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ, आदिती नायर म्हणाल्या.