अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी रशियन तेलाची खरेदी थांबवण्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिल्याचे केलेल्या विधानानंतर, गुरुवारी प्रत्यक्षात काही भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून आयात कमी करण्याची तयारी सुरू केली आहे, असे वृत्त वेगवेगळ्या तीन सूत्रांच्या हवाल्याने ‘रॉयटर्स’ने दिले.
भारत आणि चीन हे रशियन खनिज तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवरील आक्रमणानंतर युरोपला होणारी विक्री थांबल्यानंतर रशियाने सवलतीच्या किमतीत सुरू केलेल्या पुरवठ्याचा भारत-चीननेच सर्वाधिक फायदा घेतला आहे.
तथापि आता भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या सवलतीतील रशियन तेलापासून दूर जाण्याची तयारी करत आहेत. नोव्हेंबरसाठी ऑर्डर आधीच नोंदविण्यात आल्याने डिसेंबरपासून खरेदीत घट होण्याची शक्यता आहे, असे या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले. मात्र तसे अधिकृतपणे कोणत्याही कंपनीने सांगितलेले नाही.
अमेरिकेशी ऊर्जा सहकार्य
रशियाकडून तेल खरेदीबद्दल दंड म्हणून अमेरिकेने आयात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर दुप्पट शुल्क आकारले आहे. मात्र या संबंधाने वाटाघाटीसह, व्यापार चर्चेतून मार्ग काढण्यासाठी भारतीय अधिकारी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले आहेत. रशियाकडून तेलाची खरेदी थांबणे हे व्यापार वाटाघाटीच्या सफलतेसाठी महत्त्वाचे ठरेल. युक्रेनशी शांतता करार करण्यासाठी रशियावर दबाव वाढवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारताने तेल खरेदी थांबविण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलले असल्याचे ट्रम्प यांनी बुधवारी विधान केले. शिवाय, ‘अमेरिकेच्या प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यात रस दाखवला आहे, त्या दिशेने चर्चा सुरू आहे,’ असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.
‘त्यांनी (मोदींनी) आज मला आश्वासन दिले की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. हे एक मोठे पाऊल आहे. आता आम्ही चीनलाही तेच करायला लावणार आहोत,’ असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांना सांगितले. मात्र बुधवारी मोदी आणि ट्रम्प यांच्यात झालेल्या कोणत्याही दूरध्वनी संभाषणाची आपल्याला माहिती नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
भारत सरकारच्या वरिष्ठ सूत्राने सांगितले की, भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्या शक्य असल्यास रशियन तेलाची आयात कमी करतील आणि त्याऐवजी अमेरिकेतील खनिज तेल वापरतील. सूत्राने असेही स्पष्ट केले की, जर भारत आणि चीन दोघांनीही रशियाकडून खरेदी थांबवली तर तेलाच्या जागतिक किमती वाढतील आणि बाजार देखील अस्थिर होईल.