नवी दिल्ली : भारताच्या उत्पादन क्षेत्राला गती मिळताना दिसत नसून, सरलेल्या फेब्रुवारीमध्ये घटलेले नवीन कार्यादेश आणि पर्यायाने एकंदर उत्पादनही घटल्यामुळे त्याने १४ महिन्यांच्या नीचांकावर फेर धरणारी गतिमंदता दर्शविल्याचे मासिक सर्वेक्षणातून सोमवारी स्पष्ट झाले.

डिसेंबर २०२३ नंतर उत्पादन वाढ ही सर्वात कमकुवत पातळीवर नोंदवली गेली असली तरी फेब्रुवारीमध्ये देशाच्या उत्पादन क्षेत्रातील एकूण गती सकारात्मकच राहिली, असे एचएसबीसीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ प्रांजुल भंडारी म्हणाल्या. उत्पादन क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या सर्वेक्षणावर आधारीत ‘एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय)’ फेब्रुवारीमध्ये ५६.३ गुणांवर नोंदवला गेला.

जानेवारीमध्ये या निर्देशांकाने ५७.७ गुणांसह १४ वर्षांच्या उच्चांकाला गाठले होते. त्या पातळीवरून तो महिन्याभरात तीव्र स्वरूपात घसरला असला तरी, ५० पेक्षा अधिक गुणांसह तो ‘विस्तारा’च्या कक्षेत मात्र कायम राहिला. उल्लेखनीय म्हणजे देशांतर्गत नवीन कार्यादेशांची वानवा राहिली असली तरी फेब्रुवारीमध्ये नवीन निर्यात कार्यादेशांमध्ये जोरदार वाढ नोंदवली गेली. उत्पादकांनी या महिन्यांत त्यांच्या वस्तूंच्या मजबूत जागतिक मागणीचा फायदा घेतल्याचे सर्वेक्षणाचे निरीक्षण आहे.

रोजगार निर्मितीचा दर मात्र सर्वोत्तम

आंतरराष्ट्रीय मागणीमुळे कंपन्यांना खरेदी क्रियाकलाप वाढवावा लागला आणि अतिरिक्त कामगार भरतीही करावी लागली. सर्वेक्षणात सहभागी जवळजवळ एक तृतीयांश कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पुढील वर्षात उत्पादनाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, असे भंडारी म्हणाल्या. जानेवारीमध्ये नोंदवलेल्या दरापेक्षा रोजगार निर्मितीचा दरही फेब्रुवारीमध्ये इतिहासात सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकाचा राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.