मुंबई : ऑक्टोबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या पाच महिन्यांतील तीव्र पडझडीनंतर, मार्चपासून बाजाराने घेतलेल्या कलाटणीनंतर भारताच्या भांडवली बाजारात सूचीबद्ध कंपन्यांनी त्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात जवळजवळ १ ट्रिलियन डॉलरची भर घातली आहे. जगातील आघाडीच्या दहा भांडवली बाजारांमध्ये या काळात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे.
मार्च २०२५ च्या सुरुवातीपासून सातत्यपूर्ण वाढीने मुंबई शेअर बाजाराचे एकूण बाजार भांडवल ५.३३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. टक्केवारीच्या बाबतीत, भारतीय कंपन्यांचे बाजार भांडवल मार्च २०२५ पासून २१ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक या काळात अनुक्रमे १२.५ टक्के आणि १३.५ टक्क्यांनी वाढले आहेत, तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे २०.७ टक्के आणि २६ टक्क्यांनी वधारले आहेत.
जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकाचा भांडवली बाजार भारतात आहे. अमेरिकी भांडवली बाजार पहिल्या स्थानी असून, त्यापाठोपाठ चीन, जपान आणि हाँगकाँगच्या भांडवली बाजारांचा क्रमांक लागतो. मार्चच्या सुरुवातीपासून जर्मनीच्या भांडवली बाजाराने एकूण बाजार भांडवलात १४ टक्क्यांची भर घातली आहे. त्यानंतर कॅनडाने ११ टक्के, तर हाँगकाँगच्या भांडवली बाजारातील कंपन्यांनी ९ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. जपान आणि ब्रिटनमधील बाजारांकडून प्रत्येकी ८ टक्क्यांची बाजार भाडंवलात भर पडली आहे. याउलट, जगातील सर्वात मोठा भांडवली बाजार असलेल्या अमेरिकेने सुमारे २.४ टक्क्यांची माफक वाढ नोंदवली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये २.७ टक्क्यांनी वाढ झाली. तर फ्रान्स आणि तैवानने अनुक्रमे ३.९ टक्के आणि ३.२ टक्के वाढ नोंदवली.
दरम्यान, बुधवारच्या देशांतर्गत आघाडीवर समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. मात्र, लार्जकॅप क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वधारल्याने सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांना सकारात्मक बंद नोंदवला. संस्थात्मक गुंतवणूकदार स्थिर उत्पन्नाच्या शक्यता असलेल्या कंपन्यांना पसंती देत आहेत. वाहननिर्मिती आणि माहितीृतंत्रज्ञान क्षेत्रांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. संभाव्य अमेरिका-चीन व्यापार करारातील आशावादामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना फायदा होत आहे, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. सेन्सेक्समधून बुधवारी, एचसीएल टेक, इन्फोसिस, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि टाटा मोटर्स यांचे समभाग आघाडीवर होते. तर पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, नेस्ले, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांची कामगिरी निराशनजनक राहिली.
‘निफ्टी’ २५,००० वर टिकून!
अमेरिका-चीन व्यापार चर्चा आणि परदेशी निधीच्या वाढत्या ओघामुळे जागतिक भांडवली बाजारामध्ये तेजीचे वातावरण होते. परिणामी बुधवारी सेन्सेक्स १२३ अंकांनी वधारला तर निफ्टी सलग सहाव्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद झाला. दिवसअखेर सेन्सेक्स १२३.४२ अंशांनी वधारला आणि ८२,५१५.१४ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३९१.७९ अंशांची कमाई करत ८२,७८३.५ या सत्रातील उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. दुसरीकडे निफ्टी ३७.१५ अंशांनी वधारून २५,१४१.४० पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्स ८२,५१५.१४ १२३.४२ ( ०.१५%)
निफ्टी २५,१४१.४० ३७.१५ ( ०.१५%)
तेल ६७.१६ ०.४३%
डॉलर ८५.५१ -६ पैसे