मुंबई : भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांकांनी गेल्या आठवड्यात ऐतिहासिक उच्चांकी पातळीला स्पर्श केला असून या अभूतपूर्व तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत भर पडली आहे. विद्यमान कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये ११०.२५ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. बाजारात प्रमुख निर्देशांकांनी अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.

मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल विद्यमान वर्षात ११०.५७ लाख कोटी रुपयांनी वाढून ४७४.८६ लाख कोटी अर्थात ५.६७ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या महिन्यात २७ सप्टेंबरला मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४७७.९३ लाख कोटी रुपये अशा सर्वोच्च पातळीवर होते.

बीएसई सेन्सेक्सने २०२४ मध्ये आतापर्यंत १२,०२६.०३ अंश म्हणजेच १६.६४ टक्क्यांची कमाई करत गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला आहे. सेन्सेक्सने २७ सप्टेंबर रोजी ८५,९७८.२५ हे सर्वोच्च शिखर गाठले होते. २०२४ च्या वर्षाच्या सुरुवातीला, सेन्सेक्स ७२,२७१.९४ अंशांच्या पातळीवर होता. वर्ष २०२३ मध्ये, सेन्सेक्सने ११,३९९.३२ अंशांची (१८.७३) कमाई केली होती. त्या वर्षात गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत ८१.९० लाख कोटी रुपयांची भर पडली होती.

हेही वाचा >>> सरकारी बँकांत ३२ टक्के संचालकांच्या जागा नियुक्तीविना, कर्मचारी,अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या सर्व २४ जागा दशकभरापासून रिक्त

म्युच्युअल फंड उद्योगातील विक्रमी प्रवाहामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात तरलता निर्माण झाली आहे. हे या वर्षातील तेजीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा दबाव असूनही, देशांतर्गत भांडवली बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला. उल्लेखनीय बाब म्हणजे, व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी देखील चांगली कामगिरी केली असून, अनेक मधल्या व तळच्या फळीतील कंपन्यांच्या समभागांच्या किमतीत अनेकपट वाढ झाली आहे, असे स्वास्तिक इन्व्हेस्टमार्ट लिमिटेडचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले.

बीएसई मिडकॅप निर्देशांक आतापर्यंत १२,६४५.२४ अंश म्हणजेच ३४.३२ टक्क्यांनी वधारला, तर स्मॉलकॅप निर्देशांकाने १४,७७७.०९ अंशांची म्हणजेच ३४.६२ टक्क्यांनी भर घालून, सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिन्याभरात ३००० अंशांची कमाई

सरलेल्या सप्टेंबर महिन्यात सेन्सेक्सने १७ सप्टेंबर रोजी प्रथमच ८३,००० अंशांची पातळी गाठली. त्यानंतर अवघ्या तीन सत्रात म्हणजेच २० सप्टेंबरला तो प्रथमच ऐतिहासिक ८४,००० अंशांच्या पातळीवर बंद झाला. तर २५ सप्टेंबरला त्याने ८५,००० अंशांची सर्वोच्च पातळी ओलांडली. गेल्यावर्षी २९ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारभांडवल ४ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले होते. या वर्षी २१ मे रोजी त्याने ५ ट्रिलियन डॉलर बाजार भांडवलाचा टप्पा गाठला.