मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था खूप चांगली कामगिरी करत आहे आणि जागतिक आर्थिक विकासात अमेरिकेपेक्षा जास्त योगदान देत आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बुधवारी प्रतिपादन केले. भारताबद्दल ‘मृत अर्थव्यवस्था’ या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शेऱ्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही टिप्पणी केली. मध्यवर्ती बँकेने बुधवारी सार्वत्रिक अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेताना, चालू आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम राखला आणि किरकोळ महागाईचा दर मात्र पूर्वअंदाजित सरासरी ३.७ टक्क्यांपेक्षा कमी म्हणजेच ३.१ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला.
व्यापार कराची टांगती तलवार असतानाही, अनेक जागतिक अर्थसंस्थांनी खालावलेले अंदाज व्यक्त केले असतानाही मध्यवर्ती बँकेने देशाच्या विकासदराबाबत अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मल्होत्रा म्हणाले, भारताचा आकांक्षी विकास दर आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी अंदाजित ६.५ टक्क्यांपेक्षा जास्त दिसून येऊ शकेल. गेल्या काही काळात देशाने वार्षिक सरासरी ७.८ टक्क्यांनी वाढ केली आहे.
ट्रम्प यांच्या शेऱ्यासंबंधाने विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘जागतिक वाढीत आपण सुमारे १८ टक्के योगदान देत आहोत, जे अमेरिकेपेक्षा जास्त आहे. तिचे योगदान खूपच कमी सुमारे ११ टक्के किंवा तत्सम असण्याची अपेक्षा आहे. तुलनेने आपण खूप चांगले काम करत आहोत आणि आणखी सुधारणा करत राहू.’
समाधानकारक मोसमी पाऊस, महागाईतील लक्षणीय उतार, ग्राहक मागणीतील सुधार आणि अनुकूल आर्थिक परिस्थितीमुळे देशांतर्गत आर्थिक क्रियाकलाप वाढले आहेत. सशक्त सरकारी भांडवली खर्चासह, अनुकूल पतविषयक धोरण, नियामक आणि राजकोषीय धोरणांमुळे अर्थव्यवस्थेत मागणी वाढण्याची आशा आहे. येत्या काही महिन्यांत बांधकाम आणि व्यापारात सातत्यपूर्ण वाढ होऊन सेवा क्षेत्र तेजीत राहण्याची अपेक्षा आहे. मे-जूनमध्ये महत्त्वाच्या निर्देशकांनी मिश्र संकेत दिले असून ते देशांतर्गत स्थिर वाढ दर्शवत आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले.
महागाईचे ३.१ टक्क्यांचे खालावलेले अनुमान
जूनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर सलग आठव्या महिन्यात घसरून, ७७ महिन्यांच्या नीचांकी म्हणजे २.१ टक्क्यांवर नोंदविला गेला. प्रामुख्याने खाद्यान्नांच्या किमतीतीलतीव्र घसरणीमुळे महागाईत घसरण झाली आहे. वर्ष २०२५-२६ मध्ये किरकोळ चलनवाढ ३.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे, दुसऱ्या तिमाहीत २.१ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ३.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत मात्र ती वाढून ४.४ टक्के, तर आगामी २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत ती ४.९ टक्के पातळीपर्यंत चढण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. मल्होत्रा म्हणाले की, व्यापार शुल्काशी संबंधित पैलूंमुळे महागाईवर कोणताही परिणाम अपेक्षित नाही, तर डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता यांनीही स्पष्ट केले की, देशांतर्गत महागाईवर भू-राजकीय मुद्द्यांचा कोणताही ताण दिसणार नाही.