मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारच्या सत्रात जवळपास सपाटीवरच स्थिरावले. बुधवारी जाहीर होणाऱ्या महागाई दराची आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्यास प्राधान्य दिले.

मंगळवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२.८५ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ७४,१०२.३२ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ४५१.५७ अंश गमावत ७३,६६३.६० या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र दिवसअखेर ७४ हजारांच्या पातळीच्या वर राहण्यास तो यशस्वी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ३७.६० अंशांची वाढ झाली आणि तो २२,४९७.९० पातळीवर बंद झाला.

चालू असलेल्या व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदी येण्याच्या चिंतेमुळे अमेरिका आणि इतर आशियाई बाजारांमध्ये लक्षणीय समभाग विक्री झाली असली तरी, देशांतर्गत आघाडीवर सुधारणा निदर्शनास येत आहे. समभागांच्या मूल्यांकनात झालेली घट, खनिज तेलाच्या किमतीसह डॉलर निर्देशांकात घट आणि देशांतर्गत उत्पन्नांत वाढ होण्याची अपेक्षा यासारख्या सहाय्यक घटकांमुळे अस्थिरता काहीशी घटली आहे. शिवाय गुंतवणूकदारांनी आगामी किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीवर लक्ष केंद्रित आहे, ज्यावर आगामी व्याजदर कपात अवलंबून आहे, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या समभागांमध्ये इंडसइंड बँक, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, महिंद्र अँड महिंद्र, झोमॅटो, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचे समभाग सर्वाधिक घसरले. तर दुसरीकडे, सन फार्मास्युटिकल्स, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक्नॉलॉजीज, मारुती सुझुकी इंडिया, लार्सन अँड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्र बँक आणि टायटन यांचे समभाग तेजीत होते.

सेन्सेक्स ७४,१०२.३२ -१२.८५ (-०.०२%)

निफ्टी २२,४९७.९० ३७.६० (-०.१७%)

तेल ६९.७७ ०.७१

डॉलर ८७.२१ १० पैसे