पीटीआय, नवी दिल्ली

अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आठ पायाभूत क्षेत्रांची वाढ सरलेल्या एप्रिलमध्ये ०.५ टक्के अशी आठ महिन्यांच्या नीचांकी खुंटली असल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.

मुख्यतः खनिज तेल, तेलशुद्धीकरण प्रक्रिया उत्पादने आणि खतांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे एप्रिलमध्ये प्रमुख पायाभूत क्षेत्रांमधील उत्पादन खुंटले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये कोळसा, खनिज तेल, रिफायनरी उत्पादने, नैसर्गिक वायू, स्टील, सिमेंट, वीजनिर्मिती आणि खत या आठ क्षेत्रांमध्ये ६.९ टक्क्यांनी वाढ दिसून आली होती. तर मार्च २०२५ मध्ये या क्षेत्रांच्या उत्पादनात ४.६ टक्क्यांची वाढ झाली होती.

सरलेल्या एप्रिल महिन्यात खनिज तेल, तेलशुद्धीकरण प्रक्रिया उत्पादने आणि खतांच्या उत्पादन कामगिरी नकारात्मक राहिली. तर कोळसा, नैसर्गिक वायू, पोलाद आणि वीज उत्पादनातील वाढीचा दर अनुक्रमे ३.५ टक्के, ०.४ टक्के, ३ टक्के आणि १ टक्के इतकी कमी राहिली. मात्र, या एप्रिल २०२५ मध्ये सिमेंट उत्पादनात ६.७ टक्क्यांनी वाढ झाली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ०.२ टक्क्यांवर मर्यादित होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिलमध्ये प्रमुख क्षेत्रांची कामगिरी लक्षणीयरित्या खालावली आहे. परिणामी एप्रिल महिन्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ सुमारे १ टक्क्यांपर्यंत घटण्याची अपेक्षा आहे, इक्रा लिमिटेडच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या.