रिझर्व्ह बँकेकडून चालू वर्षात व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत महागाईचा दबाव कमी झाल्यानंतर व्याजदर पाव टक्क्याने कमी होऊ शकेल, असा कल ‘ब्लूमबर्ग’ने केलेल्या अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणातून बुधवारी पुढे आला. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर सध्या ६.५ टक्के आहे, त्या पातळीवरून कपात अपेक्षित असली तरी ती जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीतच केली जाईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) द्वैमासिक बैठक ६ ते ८ जूनदरम्यान होत आहे. या बैठकीत व्याजदरात कोणताही बदल न होण्याची शक्यता आहे. कारण रिझर्व्ह बँकेकडून महागाई नियंत्रणात ठेवणे आणि विकासाला गती देण्यावर भर दिला जाणार आहे.

किरकोळ महागाईचा दर दुसऱ्या तिमाहीत ४.७ टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे. याचवेळी घाऊक महागाईचा दर जूनअखेर संपणाऱ्या तिमाहीत १.४५ ते ०.६१ टक्क्यांवर येईल. यंदा मार्चमध्ये प्रथमच किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली घसरला. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सुमारे वर्षभराच्या कालावधीत व्याजदरात अडीच टक्के वाढ केली आहे. मात्र एप्रिलमधील पतधोरणापासून रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवले जातील. किरकोळ महागाईचा दर ५ टक्क्यांच्या मर्यादेत राहणे अपेक्षित असले तरी चालू वर्षात व्याजदरात कोणतीही कपात होण्याची शक्यता दिसून येत नाही, असंही विश्लेषक रितिका छाब्रा यांचं म्हणणं आहे. तर विकासदरातील वाढ कायम असून, महागाईत काही प्रमाणात घट होत असल्याने रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर स्थिर ठेवले जातील. पाऊस कमी झाला अथवा तेलाच्या किमती वधारल्यास महागाईत अपेक्षेपेक्षा अधिक वाढ होऊ शकते, असंही एमयूएफजी बँकेचे विश्लेषक मायकेल वॅन यांनी सांगितलं आहे.