मुंबई: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा (जिओफिन) समभाग येत्या १ सप्टेंबरच्या व्यवहारसत्राआधी निर्देशांकातून वगळला जाण्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. आता सर्व एस ॲण्ड पी बीएसई निर्देशांकांमधून तो वगळण्यात येणार आहे, ज्यात सेन्सेक्स, सेन्सेक्स ५०, बीएसई १००, बीएसई ५०० यांचा समावेश आहे.

‘जिओफिन’चा समभाग बाजार पदार्पणापासून सलग चार सत्रात एकंदर २० टक्क्यांनी घसरला. परिणामी बीएसई निर्देशांकांतून वगळण्याची मुदत आणखी तीन दिवसांनी म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. भांडवली बाजाराच्या दोन्ही मुख्य निर्देशांकाचा भाग असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचाच ‘जिओफिन’ हा विभक्त घटक आहे. त्यामुळे सूचिबद्धतेनंतर ‘जिओफिन’चा समभाग हा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकातील अनुक्रमे ३१ वा आणि ५१ वा समभाग म्हणून समाविष्ट केला गेला होता. रिलायन्सचा समभाग पोर्टफोलियोमध्ये धारण करणाऱ्या ‘पॅसिव्ह फंडा’वर या घडामोडीचा कोणताही परिणाम होऊ नये असा यामागे हेतू होता. तथापि ही तात्पुरती सोय करण्यात आली होती.

आणखी वाचा-रिलायन्स रिटेलमधील आणखी १० टक्के हिस्साविक्री शक्य

‘जिओफिन’चा समभाग पदार्पण दिनापासून पुढील दहा सत्रात त्याचे ‘टी’ श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. परिणामी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून झालेल्या समभाग विक्री माऱ्यामुळे सलग चार सत्रात कमाल मर्यादेपर्यंत घसरला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर समभागात खरेदी

‘जिओफिन’चा समभाग सलग चार सत्रातील कमाल घसरणीनंतर शुक्रवारच्या सत्रात खरेदीदारही लाभल्याने दिवसअखेरीस सकारात्मक पातळीवर स्थिरावला. ०.४९ टक्क्यांच्या वाढीसह समभाग २१४.५० रुपयांवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने २२४.१० रुपयांची सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार, कंपनीचे बाजारभांडवल १,३६,२७७ कोटी रुपयांचे आहे.