पुणे : जागतिक पातळीवरील व्यापार तणावामुळे जगभरातील प्रमुख चलनांच्या तुलनेत रुपयात घसरण झाली आहे. त्यातच भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे रुपयाचे आणखी अवमूल्यन झाले आहे. यामुळे परदेशातून आयात महागल्याचा फटका मर्सिडीज बेंझ आणि ऑडी या आलिशान मोटारींच्या उत्पादक कंपन्यांना बसू लागला आहे. त्यामुळे या कंपन्यांनी मोटारींच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
अमेरिकेने इतर देशांतील वस्तूंच्या आयातीवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचे पाऊल उचलले. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली. यातून जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. यामुळे गेल्या काही महिन्यांत रुपयात घसरण होत आहे. विशेषत: युरोच्या तुलनेत रुपयात गेल्या चार महिन्यांत सुमारे १० टक्के घसरण झाली आहे. याचा फटका युरोपमधून होणाऱ्या आयातीला बसत आहे. आयातीचा खर्च वाढू लागल्याने कंपन्यांकडून हा भार ग्राहकांवर टाकला जात आहे. त्यामुळे जर्मनीतील ऑडी आणि मर्सिडीज बेंझ या कंपन्यांनी मोटारींच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
युरोच्या तुलनेत रुपयामध्ये मोठी घसरण झाल्याने आयातीचा खर्च वाढला आहे. तयार मोटारींसह सुट्या भागांची आयात महाग झाली आहे. यामुळे या वाढलेल्या खर्चातील काही भाग मोटारींच्या किमतीतील वाढीच्या रूपाने ग्राहकांवर टाकत आहोत, असे मर्सिडीज बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, संतोष अय्यर म्हणाले.
मर्सिडीजकडून ९० हजार ते १२.२ लाखांपर्यंत वाढ
मर्सिडीज बेंझ इंडिया कंपनीकडून युरोपमधून मोटारी आयात करून त्यांच्या विक्री केली जाते. याचबरोबर मोटारींचे सुटे भाग आयात करून भारतात काही मोटारींची निर्मिती केली जाते. आयातीचा खर्च वाढल्याने कंपनीने मोटारींच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला १.५ टक्के वाढ केली जाणार असून, त्याची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे. पुढील वाढीचा टप्पा १ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि त्या वेळीही किमतीत १.५ टक्के वाढ केली जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या मोटारींच्या किमती किमान ९० हजार रुपये ते १२ लाख २० हजार रुपयांपर्यंतची वाढ १ जूनपासून होणार आहे.
ऑडीकडून २ टक्के वाढ
ऑडी इंडियानेही मोटारींच्या किमतीत २ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवीन किमती १५ मेपासून लागू होणार आहेत. कंपनीच्या सर्वच मोटारींच्या किमतीत वाढ होणार आहे. आयात महागल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले असून, ग्राहकांवर त्याचा होणारा परिणाम कमीत कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे कंपनीने स्पष्ट केले.