मुंबई : जागतिक बाजारातील तेजीमुळे सलग तीन सत्रातील घसरणीनंतर बुधवारी सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी फेरउसळी घेतली आणि ते सकारात्मक पातळीवर स्थिरावले. एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभाग झालेल्या जोरकस खरेदीने बाजारात चैतन्य निर्माण झाले. बुधवारच्या सत्राअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २६०.७४ अंशांनी वधारून ८०,९९८.२५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ३४९.७८ अंशांची कमाई करत ८१,०८७.२९ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र तो ८१,००० च्या पातळीवर टिकून राहण्यास अयशस्वी ठरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७७.७० अंशांची वाढ झाली आणि तो २४,६२०.२० पातळीवर बंद झाला.

देशांतर्गत भांडवली बाजार एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होते. अमेरिकेतील रोजगारासंबंधाने आलेली मजबूत आकडेवारी आणि अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी होण्याची चिन्हे यासारख्या अनुकूल जागतिक संकेतांमुळे बाजारात सकारात्मक वातावरण होते. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिड आणि स्मॉल-कॅप क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी कामगिरी चांगली राहिली. मूल्यांकनात घट झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यातील समभाग खरेदीला प्राधान्य दिले. आता गुंतवणूकदारांचे बुधवारपासून सुरू झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण बैठकीकडे लक्ष लागले आहे. या बैठकीतून व्याजदर कपात, त्याचप्रमाणे विकासवेग आणि महागाईच्या अंदाजाबद्दल अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा आहे, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समधील इटर्नल, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, टाटा स्टील आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन आणि लार्सन अँड टुब्रो यांच्या समभागात घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) २,८५३.८३ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

रुपयाची २९ पैशांची गटांगळी

मुंबई: सलग दुसऱ्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत २९ पैशांनी घसरून ८५.९० प्रति डॉलरवर बंद झाला. रशिया-युक्रेनमधील भू-राजकीय तणाव आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. शिवाय, गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेच्या पतविषयक धोरणातून मिळणाऱ्या संकेतांची वाट पाहत आहेत, असे परकीय चलन बाजार विश्लेषकांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या दर-निर्धारण समितीने बुधवारी पतविषयक धोरणावर तीन दिवसांच्या विचारमंथनाला सुरुवात केली असून येत्या ६ जून पतधोरण जाहीर केले जाईल. तज्ज्ञांच्या मते, रिझर्व्ह बँकेकडून पाव ते अर्धा टक्के रेपो दर कपात शक्य आहे. परकीय चलन बाजारात, रुपयाने ८५.६९ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरात डॉलरच्या तुलनेत त्याने ८५.६९ चा उच्चांक आणि ८६.०५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. तर मंगळवारी, रुपया २२ पैशांनी घसरून ८५.६१ प्रति डॉलरवर स्थिरावला होता. सलग दोन सत्रात मिळून रुपयाने ५१ पैशांनी घसरण नोंदवली आहे. दरम्यान, सहा परदेशी चलनांच्या तुलनेत अमेरिकी चलनाच्या ताकदीचे मोजमाप करणारा डॉलर निर्देशांक ०.१२ टक्क्यांनी घसरून ९९.११ वर व्यवहार करत होता.

सेन्सेक्स ८०,९९८.२५ २६०.७४ ( ०.३२%)

निफ्टी २४,६२०.२० ७७.७० ( ०.३२%)

तेल ६५.९२ ०.३८%

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉलर ८५.९० २९ पैसे