मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईच्या नोंदणीकृत गुंतवणुकदारांच्या संख्येने १२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, नवीन १ कोटी गुंतवणूकदारांची भर फक्त आठ महिन्यांत पडली आहे. शिवाय शेअर बाजार गुंतवणुकीतील महिलांचे प्रमाण असून एनएसईमधील चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे.

एनएसईच्या आकडेवारीनुसार, विद्यमान वर्षात जानेवारीमध्ये बाजारमंचाने ११ कोटींचा टप्पा ओलांडला होता. एनएसईने कामकाज सुरू केल्यानंतर १४ वर्षांनी, १ कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा गाठला होता. त्यापुढील १ कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा गाठण्यासाठी सुमारे सात वर्षे लागली, त्यानंतर १ कोटी गुंतवणूकदारांसाठी सुमारे साडेतीन वर्षे लागली आणि पुढील एका वर्षापेक्षा थोडा जास्त वेळ लागला होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मार्च २०२१ मध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या संख्यने ४ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी २५ वर्षांहून अधिक काळ लागला, त्यानंतर सुमारे ६-७ महिन्यांत १ कोटी गुंतवणूकदारांची भर पडली.

वाढते डिजिटलायझेशन आणि मुख्यतः ग्रो, एंजल वन आणि झिरोधासारख्या तंत्रज्ञानस्नेही दलाली पेढ्यांमुळे ही वाढ झाली आहे. याबरोबरच वाढता मध्यमवर्ग आणि सहाय्यक धोरणात्मक उपाययोजनांमुळे गुंतवणूकदारांच्या संख्येचा विस्तार वाढला आहे. एकूणच, २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत एनएसईमध्ये नोंदणीकृत गुंतवणूकदार खात्यांची एकूण संख्या २३.५ कोटींवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षात २३ सप्टेंबरपर्यंत, निफ्टी ५० निर्देशांकाने ७ टक्के परतावा दिला आहे, तर निफ्टी ५०० निर्देशांकाने या कालावधीत ९.३ टक्के वाढ नोंदवली.

तरुण गुंतवणूकदार अधिक

१२ कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदारांचे सरासरी वय सुमारे ३३ वर्षे आहे, जे पाच वर्षांपूर्वी ३८ वर्षे होते, त्यापैकी जवळजवळ ४० टक्के गुंतवणूकदार ३० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. देशातील कानाकोपऱ्यातील व्यक्ती भांडवली बाजाराशी जोडली गेली आहे. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत, तीन राज्यांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त नोंदणीकृत गुंतवणूकदार होते, ज्यामध्ये महाराष्ट्र १.९ कोटी गुंतवणूकदारांसह आघाडीवर होता, त्यानंतर उत्तर प्रदेश १.४ कोटी गुंतवणूकदार आणि गुजरात १.०३ कोटी गुंतवणूकदारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भांडवली बाजारात महिलाराज

सध्याचे नवीन गुंतवणूकदारांचे वाढते प्रमाण हे भारतीयांच्या संपत्ती निर्मितीच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणत असल्याचे निदर्शक आहेत. महत्त्वाचे म्हणजेच, प्रत्येक चार नवीन गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे. एनएसईकडे सुमारे १२ कोटी गुंतवणूकदार नोंदणीकृत आहेत, त्यात महिला गुतंवणूकदारांचे प्रमाण २२ टक्क्यांहून अधिक आहे. वर्ष २०१५ पासून महिला गुंतवणूकदारांच्या संख्येत ६.८ पट वाढ झाली आहे.