लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सलग नवव्या सत्रात तेजीसह स्थिरावला, तर निफ्टी निर्देशांक बुधवारी प्रथमच विक्रमी २०,००० पुढे बंद स्तर नोंदवण्यास यशस्वी झाला. बँकिंग, ऊर्जा आणि दूरसंचार कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केल्याने निर्देशांकांना चालना मिळाली.

बुधवार दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २४५.८६ अंशांनी वधारून ६७,४६६.९९ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने बुधवारच्या व्यवहारात ६७,५६५.४१ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला जी ६७,६१९.१७ या ऐतिहासिक विक्रमी पातळीच्या नजीक आहे. दुसरीकडे निफ्टी प्रथमच विक्रमी २०,००० अंशांच्या वर २०,०७० पातळीवर स्थिरावला. त्यात ७६.८० अंशाची भर पडली.

आणखी वाचा-बँक ऑफ इंडियाने बाँड विकून २ हजार कोटी जमवले, शेअर्स जवळपास ६ टक्क्यांनी वाढले, पैसा कुठे वापरला जाणार?

कमकुवत जागतिक संकेत असतानाही देशांतर्गत निर्देशांकांनी पुन्हा वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली. ऑगस्टमध्ये देशांतर्गत किरकोळ महागाईचा दर ६.८३ टक्क्यांपर्यंत नरमला आहे, तर औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) झालेल्या वाढीमुळे देशाची अर्थव्यवस्थेच्या सुदृढतेला अधोरेखित केले.

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेतील आकुंचन आणि खनिज तेलाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, गुंतवणूकदार आता अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेत आहेत. कारण त्यावरून अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या पुढील धोरणाची दिशा स्पष्ट होईल, असे मत जिओजित फायनान्शियलचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

आणखी वाचा-मुंबईतील सर्वात मोठा जमीन करार, शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट बंद, बॉम्बे डाइंगची मालमत्ता ‘एवढ्या’ कोटींना विकणार

सेन्सेक्समध्ये भारती एअरटेलचा समभाग २.७२ टक्के तेजीत होता, त्यापाठोपाठ टायटन, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, पॉवर ग्रिड, एनटीपीसी आणि टाटा मोटर्स या कंपन्यांचे समभाग वधारले. तर महिंद्र अँड महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, नेस्ले, जेएसडब्ल्यू स्टील, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्र आणि मारुतीच्या समभागात घसरण झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेन्सेक्स ६७,४६६.९९ २४५.८६ (०.३७)
निफ्टी २०,०७० ७६.८० (०.३८)
डॉलर ८२.९७ २
तेल ९२.५६ ०.६६