भारताचा शेजारी देश पाकिस्तान गेल्या दोन-तीन वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान, पाकिस्तानने नुकताच त्यांचा आर्थिक वर्ष २०२३-२४ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. या अहवालात वेगवगळ्या क्षेत्रांसंबधीची आकडेवारी जाहीर केली असली तरी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते गाढवांच्या संख्येने. कारण गेल्या वर्षभरात पाकिस्तानमधील गाढवांची संख्या एक लाखाने वाढली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या ५९ लाख गाढवं असल्याचं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणानुसार पाकिस्तानमधील गाढवांची संख्या वाढली आहे, मात्र देशाचा जीडीपी (सकल देशांतर्गत उत्पादन) वाढलेला नाही. जीडीपीबाबत सरकारने ठेवलेलं उद्दीष्ट तिथल्या सरकारला साध्य करता आलेलं नाही.

सर्वाधिक गाढवं असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सध्या गाढवं चीनला निर्यात करून पैसे कमवण्याच्या विचारात आहे. बिझनेस टूडेच्या वृत्तानुसार पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी ११ जून रोजी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार, पाकिस्तानात गेल्या काही वर्षांमध्ये ओझं वाहून नेणारा प्राणी अशी ओळख असलेल्या गाढवांची संख्या वाढली आहे. पाकिस्तानी अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात देशातील पशुधनाचा आढावा घेण्यात आला आहे.

२०२०-२१ मध्ये पाकिस्तानमधील गाढवांची संख्या ५५ लाखांच्या आसपास होती, २०२१-२२ मध्ये ती ५६ लाख, २०२२-२३ मध्ये ५७ लाख, २०२३-२४ मध्ये ५८ झाली होती. यंदा ही संख्या वाढून ५९ लाखांच्या पुढे गेली आहे. पशुपालन हा पाकिस्तानमधील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे. पाकिस्तानमधील खेड्यांमध्ये राहणारी ८० लाखांहून अधिक कुटुंबं पशुपालनाचा व्यवसाय करतात.

हे ही वाचा >> Gold-Silver Price: बाजारपेठेत सोन्याचे भाव गडगडले, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा दर आता… 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृषी क्षेत्रात गेल्या १९ वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरी

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पाकिस्तानने जीडीपी वाढीचं लक्ष्य गाठलेलं नाही. पाकिस्तानने या आर्थिक वर्षासाठी ३.५ टक्के वाढीचं उद्दीष्ट ठेवलं होतं, मात्र त्यांच्या जीडीपीमध्ये केवळ २.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रातील खराब कामगिरीमुळे हे उद्दीष्ट साध्य करता आलं नाही, असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या बाजूला, कृषी क्षेत्राने मात्र मोठी वाढ नोंदवली आहे. कृषी क्षेत्रात ६.२५ टक्के वृद्धी पाहायला मिळाली आहे. कृषी क्षेत्रात ३.५ टक्के वाढ करण्याचं उद्दीष्ट तिथल्या सरकारने ठेवलं होतं. मात्र कृषी क्षेत्रात उद्दीष्टाच्या जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. औद्योगिक क्षेत्रात केवळ १.२१ टक्के वाढ झाल्याचं अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी सांगितलं.