लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबईः पतविषयक वाणिज्यिक सुज्ञता सेवा तसेच पत व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापन आणि विदा विश्लेषण क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपनी पेपर ॲडव्हान्टेजने भारतातील व्यवसायात दुपटीने वाढ केली असून, नजीकच्या भविष्यातही हा वृद्धीपथ कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या पेपर ॲडव्हान्टेजकडून, कर्ज प्रदात्या बँका आणि वित्तीय संस्थांना कर्जविषयक निर्णयप्रक्रियेत मदत करण्यासह, कर्ज-इच्छुक व्यावसायिक, उद्योजक ग्राहक आणि कर्जदाते यातील दुवा या स्वरूपातही ती काम करते. जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक तरुणांचा भरणा असलेल्या भारतात, पतपुरवठा आणि वित्तीय सेवा बाजारपेठेतही आनुषंगिक वाढ होणे अपेक्षित आहे, असे पेपर ॲडव्हान्टेज इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आगामी काळात देशात किरकोळ तसेच एमएसएमई क्षेत्रातून कर्ज मागणी दमदार राहील असे नमूद करताना, दरसाल २० टक्के वा त्याहून अधिक सरासरी कर्ज वितरणाचा दर राहणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

अशा विस्तारणाऱ्या बाजारपेठेची गरज म्हणून, विदा आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करून कार्यक्षमतेने कर्ज वितरण करणेही तितकेच आवश्यक असून, या कामी पेपर ॲडव्हान्टेजच्या सेवा उपयुक्त ठरतात. कर्ज पात्रतेचे प्रचलित निकष तसेच क्रेडिट स्कोअरशिवाय पतविषयक योग्यतेचे मूल्यांकन करून भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला आर्थिक समावेशनास चालना देण्याच्या उद्देशाने आवश्यक ती सर्व पावले टाकण्याची ग्वाहीही कुलकर्णी यांनी दिली. परिणामी, सार्वजनिक व खासगी बँका, फिनटेक, लघु वित्त कंपन्या, सहकारी बँका, स्मॉल फायनान्स बँकांशी सहयोग आणि सामंजस्यातही विस्तार होत असल्याचे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृत्रिम प्रज्ञेची सेवांना जोड

अलीकडेच ‘रिओम डॉट एआय’ या कंपनीच्या संपादनातून, पेपर ॲडव्हान्टेजच्या भारतीय बाजारपेठेत आक्रमक विस्ताराच्या नियोजनाला अधोरेखित केले गेले आहे. यातून कंपनीच्या सेवांना कृत्रिम प्रज्ञा आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर चालित पत व्यवस्थापन प्रारूपाची जोड मिळून, व्यवसाय वाढीच्या व्याप्तीत आणि शक्यतेत भर घातली गेली आहे.