‘सेमिकॉन इंडिया’चे उद्धाटन

नवी दिल्ली : देशातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलरच्या उलाढालीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी निर्धारित केले. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची उलाढाल गेल्या दशकभरात वेगाने वाढत असून, सध्या ती १५० अब्ज डॉलर आहे.

‘सेमिकॉन इंडिया’ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. ही परिषद तीन दिवस चालणार असून, त्यात देशाची सेमीकंडक्टर व्यूहनीती आणि भारत हा सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनविण्यासाठीचे धोरण यावर भर देण्यात आला आहे. मोदी म्हणाले की, सध्या भारताचा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग १५० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आता आपण आणखी मोठे लक्ष्य ठेवायला हवे. या दशकाच्या अखेरीस इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला आपल्याला ५०० अब्ज डॉलरवर न्यावयाचे आहे. त्यातून देशातील तरुणांसाठी ६० लाख रोजगार निर्माण होतील. शंभर टक्के इलेक्ट्रॉनिक्स निर्मिती भारतात व्हावी, हे आमचे उद्दिष्ट आहे. भारत हा सेमीकंडक्टर चिप बनवेल आणि त्याचे अंतिम उत्पादनही बनवेल.

हेही वाचा >>> मर्सिडीज बेंझची पूर्णपणे इलेक्ट्रिक ‘मेबॅक ईक्यूएस ६८०’ सादर

उद्योग हे गुंतवणूक करून मूल्य निर्मिती करीत असताना सरकार स्थिर धोरणे आणि व्यवसायपूरक वातावरण निर्माण करीत आहे. जागतिक डिझाईनिंग क्षेत्रात भारताचे योगदान २० टक्के असून, ते सातत्याने वाढत आहे. भारत हा सेमीकंडक्टर उद्योगासाठी ८५ हजार तंत्रज्ञ, अभियंते आणि संशोधन व विकास तज्ज्ञ यांचे मनुष्यबळ तयार करीत आहे. आपले विद्यार्थी हे उद्योगांमध्ये काम करण्यासाठी तयार असावेत, यावर भर दिला जात आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.

भारतातील सेमीकंड्कटर परिसंस्था ही केवळ देशातील नव्हे तर जागतिक आव्हानांवर उपाय ठरेल. केंद्र सरकारने आतापर्यंत देशात पाच सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यातील दोन प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू झाले असून, इतर तीन प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होईल.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सेमीकंडक्टर प्रकल्पाचे अनेक प्रस्ताव विचाराधीन आहेत. त्यांचे मूल्यमापन केल्यानंतर ते मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केले जातील. याचबरोबर केंद्र सरकार लवकरच सेमीकॉन २.० कार्यक्रम सुरू करणार आहे. आधीच्या कार्यक्रमाच्या तुलनेत त्यात विस्तार करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री