मुंबई : अर्थव्यवस्थेत विकासाच्या दृष्टीकोनातून संरचनात्मक बदल होत असून ती सध्या ८ टक्के दराने मार्गक्रमण करत आहे. आगामी काळात देखील चलनवाढीत घसरणीसह हा विकासवेग कायम राहण्याची आशा आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी केले. त्यांनी मुंबईत मंगळवारी बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या १८८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले.

सध्या, जागतिक पातळीवरील भारत ही सर्वाधिक वेगाने वाढ साधत असलेली अर्थव्यवस्था असून, सरलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत तिने सर्वाधिक विकासवेग अनुभवला. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देखील ही गती कायम आहे. ग्रामीण भागातून वाढत असलेली ग्राहक मागणी आणि उपभोगामुळे रिझर्व्ह बँकेच्या अनुमानापेक्षा सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) वेग अधिक राहिल, असेही दास म्हणाले.

हेही वाचा >>> अदानी समूहाचे १.३ लाख कोटींच्या भांडवली गुंतवणुकीचे नियोजन

देशाच्या अर्थव्यवस्थेतील वाढ ही बहुक्षेत्रीय आहे. भारतासारख्या मोठ्या देशाची अर्थव्यवस्था उत्पादन, सेवा किंवा निर्यातप्रधान असा एकट्या क्षेत्रावर अवलंबून राहून चालणार नाही. देशाचा विकास हा अनेक क्षेत्रांवर आधारलेला आहे. कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी बजावली असून या क्षेत्रात अजूनही बरेच काम होणे बाकी आहे. विशेषत: पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी संदर्भात सुधारात्मक बदल अपेक्षित आहेत, असे दास म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जीएसटीबाबत गौरवोद्गार

स्वातंत्र्यानंतर वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी ही कर क्षेत्रातील सर्वात मोठी संरचनात्मक सुधारणा आहे. जीएसटीमुळे व्यवसाय अधिक सोयीस्कर झाला आहे. भारतातील जीएसटी प्रणाली इतर अनेक देशांच्या तुलनेत खूप वेगाने यशस्वीरित्या रूळली आहे. जीएसटीअंतर्गत मासिक संकलन १.७० लाख कोटीपुढे पोहोचले आहे.