मुंबई : केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत २८ ऑक्टोबर २०२० मध्ये गुंतविलेल्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन (रिडम्प्शन) करायचे झाल्यास, रिझव्र्ह बँकेने १२,१९८ रुपये प्रतिग्रॅम असा दर निश्चित केल्याचे जाहीर केले. रोख्यांच्या खरेदी किमतीच्या तुलनेत हा दर १६६ टक्के अधिक आहे.
गुंतवणूकदारांना २८ ऑक्टोबर २०२० मध्ये प्रतिग्रॅम ४,५८९ रुपये दराने सुवर्ण रोख्यांचे वाटप करण्यात आले होते. तर ऑफलाइन खरेदी करणाऱ्यांनी प्रति ग्रॅम ४,६३९ रुपये किंमत त्यावेळी निश्चित करण्यात आली होती. परिणामी आता निश्चित करण्यात आलेली १२,१९८ किमतीच्या तुलनेत गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम ७,६०९ रुपयांचा लाभ झाला आहे, शिवाय यात रोख्यांच्या माध्यमातून मिळणारे वार्षिक व्याज समाविष्ट केलेली नाही.
सुवर्ण रोख्यांचा विमोचन दर हा सरलेल्या २३, २४ आणि २७ ऑक्टोबर २०२५ या दिवसाअंती बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या सरासरीच्या आधारावर निश्चित केला गेला आहे. भारतीयांमधील धातूरूपी सोन्याचे आकर्षण पाहता त्याला पर्याय या रूपाने आणि सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या विदेशी चलनात कपात केली जाऊ शकेल, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू केली गेली.
१७ नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वप्रथम विक्री करण्यात आलेल्या सुवर्ण रोख्यांची विक्री २,९५७ रुपये प्रतिग्रॅम अशी होती. त्या तुलनेत विमोचनासाठी निर्धारित १२,१९८ रुपये प्रतिग्रॅम हा दर १६६ टक्के परतावा मिळवून देणारा आहे. या रोख्यांचा मुदत कालावधी हा आठ वर्षांचा असून, पाच वर्षांनंतर यातील गुंतवणूक मुदतपूर्व काढण्याची मुभा दिली गेली आहे.
