भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. गेले तीन दिवस ही बैठक सुरू होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच बैठक असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, या बैठकीनंतर आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली आहे.

रेपो रेट ‘जैसे थे’

शक्तिकांत दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेपो रेट ६.५ टक्क्यावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. पतधोरण समितीच्या ६ पैकी ४ सदस्यांनी रेपो रेट जैसे थे स्थिर ठेवण्याच्या बाजूनं मतदान केल्याचे दास यांनी यावेळी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे रिझर्व्ह बँकेनं आठव्यांदा रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवल्याने नागरिकांनाही आता ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा – अदानी समूहातील कंपन्यांचा नफा वर्षागणिक ५५ टक्के वाढीसह ३०,००० कोटींपुढे

जीडीपीमध्ये ७.२ टक्के वाढीचा अंदाज

दास यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षातील जीडीपीबाबतही भाष्य केलं आहे. त्यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी जीडीपीमध्ये ७.२ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. “आर्थिक वर्ष २०२४-२०२५ च्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी जीडीपी ७.३ टक्के, जुलै-सप्टेंबरसाठी ७.२ टक्के, ऑक्टोबर-डिसेंबरसाठी ७.३ टक्के आणि जानेवारी-मार्चसाठी ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे”, अशी प्रतिक्रिया दास यांनी दिली.

“महागाई दर ४ टक्क्यांवर आणण्याचा आमचा प्रयत्न”

पुढे बोलताना, त्यांनी महागाई दराबाबतही अंदाज व्यक्त केला. “अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या उत्तम असून महागाई दरावर आमचं लक्ष आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महागाई दर ४ टक्क्यांवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.

हेही वाचा – नवे सरकार येण्यापूर्वीच गुंतवणूकदारांचे ३९ लाख कोटी बुडाले, ४ वर्षांनंतर पहिल्यांदाच बाजारात एवढी घसरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेअर मार्केटमध्येही उत्साह

विशेष म्हणजे दास यांनी जीडीपीबाब अंदाज व्यक्त करताच शेअर मार्केटमध्येही उत्साह बघायला मिळाला आहे. या घोषणेनंतर सेन्सेक्स ७०० अंकांनी वधारला असून ७५८१४ पर्यंत पोहोचला आहे.