नवी दिल्ली : किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये मुख्यत: अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे अपेक्षेप्रमाणे घसरून, ५.१ टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर ओसरल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत आकडेवारीने दर्शवले. तथापि हा दर रिझर्व्ह बँकेकडून निर्धारित ४ टक्क्यांच्या समाधान पातळीच्या अद्याप वरच आहे. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर आधीच्या डिसेंबर महिन्यात ५.६९ टक्के आणि गतवर्षी म्हणजे जानेवारी २०२३ मध्ये ६.५२ टक्के पातळीवर होता. ऑगस्ट २०२३ मध्ये किरकोळ महागाई दराने ६.८३ टक्क्यांचा उच्चांक नोंदवून, चिंताजनक पातळी गाठली होती.

हेही वाचा >>> चढ्या मूल्यांकनावर निर्देशांकांचा टिकाव आव्हानात्मक; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची पाच शतकी घसरण 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये अन्नधान्य घटकांमधील किरकोळ किंमतवाढीची पातळी ८.३ टक्के होती, जी आधीच्या महिन्यातील ९.५३ टक्क्यांवरून लक्षणीय खाली आली आहे. भाज्या (-४.२ टक्के) फळे, (-२.० टक्के), मांस, मासे (-०.९ टक्के) आणि डाळी (०.८ टक्के) यामधील किंमतवाढ महिन्यागणिक सर्वाधिक घसरल्याचे आढळून आले. त्याउलट अंडी (३.५ टक्के) आणि तृणधान्ये आणि उत्पादने (०.८ टक्के) यांच्या किमती जानेवारीत वाढल्या.

हेही वाचा >>> डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन दरात ३.८ टक्के वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवड्यात द्विमासिक पतधोरणाच्या आढाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी किरकोळ महागाई दर घसरण्याचे अनुमान व्यक्त केले असले तरी तो ४ टक्क्यांच्या उद्दिष्टांखाली आगामी आर्थिक वर्षात येऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे. किरकोळ चलनवाढीच्या संदर्भात दास म्हणाले की, किरकोळ महागाई दर २०२३-२४ संपूर्ण वर्षासाठी ५.४ टक्के आणि जानेवारी ते मार्च या शेवटच्या तिमाहीत तो ५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षी सामान्य मान्सून गृहीत धरून, वर्ष २०२४-२५ साठी किरकोळ महागाई दर ४.५ टक्के राहील आणि पहिल्या तिमाहीत तो ५ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ४ टक्के; तिसऱ्या तिमाहीत ४.६ टक्के; आणि चौथ्या तिमाहीत तो ४.७ टक्के राहील असे मध्यवर्ती बँकेचे अनुमान आहे. मध्यवर्ती बँक व्याजदरासंबंधी निर्णय घेताना किरकोळ महागाई दराची पातळीच लक्षात घेत असते आणि ही पातळी ४ टक्क्यांवर आणण्याचे तिचे मध्यमकालीन उद्दिष्ट आहे.