मुंबई: रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपये मूल्याची नोट चलनातून काढून घेण्याच्या घोषणेला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीही या हद्दपार ‘गुलाबी’ नोटा अजूनही पूर्णपणे परतल्या नसल्याची माहिती मध्यवर्ती बँकेने शुक्रवारी दिली. अजूनही ६,२६६ कोटी रुपये मूल्याच्या नोटा जमा झालेल्या नाहीत आणि त्या लोकांहाती आहेत, असे तिने स्पष्ट केले.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच १९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोटांचे एकूण मूल्य त्या समयी ३.५६ लाख कोटी रुपये होते. रिझर्व्ह बँकेने ७ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध केली होती. आतापर्यंत ९८.२४ टक्के नोटा परत मिळाल्या आहेत. मात्र ३० एप्रिल २०२५ पर्यंत नागरिकांच्या हाती ६,२६६ कोटी रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत.
अजूनही संधी…
ज्या नागरिकांकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील, त्यांना मुंबई, नागपूरसह, अहमदाबाद, बेंगळूरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुवनंतपुरम अशा रिझर्व्ह बँकेच्या १९ कार्यालयांमध्ये नोटा जमा किंवा बदलून घेता येतील. शिवाय देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात पाठवणे शक्य आहे.