मुंबई : देशांतर्गत भांडवली बाजारातील घसरण आणि खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रुपया सोमवारच्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २३ पैशांनी घसरून ८५.७३ प्रतिडॉलरवर बंद झाला. रुपयाने सकारात्मक पातळीवर व्यवहारास सुरुवात केली होती. परकीय चलन बाजारात, रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८५.४८ पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली. दिवसभरात त्याने ८५.४४ ची उच्चांकी आणि ८५.७७ ही सत्रातील नीचांकी पातळी गाठली होती. दिवसअखेर २३ पैशांनी घसरून ८५.७३ पातळीवर बंद झाला. शुक्रवारच्या सत्रात, रुपया २२ पैशांनी वधारून ८५.५० प्रतिडॉलरवर बंद झाला होता.
देशांतर्गत शेअर बाजारातील कमकुवतपणा आणि खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सोमवारी रुपयात घसरण झाली. महिन्याच्या अखेरीस डॉलरच्या मागणीमुळेही देशांतर्गत चलनावर दबाव निर्माण झाला, असे मत मिरे ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी यांनी व्यक्त केले. मात्र अमेरिकी डॉलरमधील कमकुवतपणामुळे रुपयातील तीव्र घसरण रोखली गेली. अमेरिकेकडून आलेल्या अपेक्षेपेक्षा चांगल्या महागाईच्या आकडेवारीमुळे अमेरिकन डॉलर घसरला. येत्या काही सत्रांत रुपया प्रतिडॉलर ८५.३० ते ८५.८५ च्या श्रेणीत व्यवहार करणे अपेक्षित आहे, असे चौधरी म्हणाले. दरम्यान, सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक ०.२६ टक्क्यांनी घसरून ९७.१४ वर आला.