मुंबई: दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापक असलेल्या सॅनलॅमने श्रीराम समूहातील श्रीराम अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये १०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून २३ टक्के हिस्सेदारी मिळविली आहे.

हा व्यवहार म्हणजे सनलॅमचा भारतात वेगाने वाढत मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश असून, श्रीराम समूहाशी गेली दोन दशकांहून अधिक सुरू असलेल्या भागीदारीला यातून तिने आणखी घट्ट केले आहे. बहुराष्ट्रीय विस्तार असलेल्या सनलॅमकडून जवळपास ८० अब्ज अमेरिकी डॉलरच्या मालमत्तेचे व्यवस्थापन पाहिले जात आहे.

श्रीराम एएमसीने सनलॅम इमर्जिंग मार्केट्स (मॉरिशस) लिमिटेड या कंपनीला ३८.८९ लाख भांडवली समभागांचे प्राधान्याने वाटप केले आहे. यातून विद्यमान प्रवर्तक श्रीराम क्रेडिट कंपनी लिमिटेडसोबत सह-प्रवर्तक म्हणून ही कंपनी श्रीराम एएमसीत सामील झाली आहे. परिणामी, सर्व प्रवर्तकांची कंपनीतील भागधारणा सध्याच्या ६२.५५ टक्क्यांवरून, ७१.१७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. सनलॅमच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यासाठी श्रीराम एएमसीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

विविध संसाधने आणि कौशल्ये एकमेकांशी गुंफताना विविध उत्पन्न श्रेणीतील ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारे आकर्षक गुंतवणूक पर्यायांची निर्मिती करणे, हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे, असे श्रीराम एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी कार्तिक जैन म्हणाले. या वाढीव भांडवली गुंतवणुकीचा वापर हा उत्पादन विस्तार आणि प्रतिभावान मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीराम एएमसी ही भारताच्या शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातील पहिल्या काही कंपन्यांपैकी एक असून, मंगळवारी या गुंतवणूक व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर कंपनीचा समभाग १०.४३ टक्के मुसंडीसह ४९० रुपये पातळीपर्यंत वधारला.