भांडवली बाजार नियंत्रक सेबीने जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सला गुंतवणूक सल्लागार म्हणून कामकाज सुरू करण्यास बुधवारी परवानगी दिली. याबरोबरच मुंबई शेअर बाजाराने देखील या कंपनीला हिरवा कंदिल दिला आहे. जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि अमेरिकेतील ब्लॅकरॉक इन्क. यांच्यातील ५०:५० भागीदारी असलेल्या संयुक्त उपक्रम आहे.
गेल्या महिन्यात २७ मे २०२५ रोजी सेबीकडून जिओ ब्लॅकरॉक ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडला भारतातील त्यांच्या म्युच्युअल फंड व्यवसायासाठी गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून कामकाज सुरू करण्यासाठी नियामक मंजुरी मिळाल्याची घोषणा झाली होती. या परवान्यासह, जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स आता गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले डिजिटल-फर्स्ट उत्पादन विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सने निवेदनात म्हटले आहे.
जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सने मार्क पिलग्रेम यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा देखील केली. गुंतवणूकदारांना जागतिक दर्जाच्या सल्लागार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे जिओ फिनचे व्यवस्थापकीय संचाल हितेश सेठिया म्हणाले.