मुंबई: ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’च्या वापरामुळे सुरक्षेविषयक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते, मात्र या नवतंत्रज्ञानाच्या वापरातही बाजार प्रणाली सुरक्षित राहिल याची खात्री केली जात आहे, असे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’चे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले.
एकाच वेळी अगणित शक्यतांचा शोध घेत, गुंतवणुकीसाठी वापरात येणाऱ्या ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’च्या तांत्रिक क्षमतांमुळे अनिष्ट घटकांना टाळता येणे शक्य असून काही संभाव्य आगामी घटनांचा आधीच अंदाज बांधता येणे शक्य आहे. सेबीने ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ प्रणाली वापरण्यासंबधी कृती योजना आखली आहे, असे पांडे यांनी येथे वार्षिक जागतिक फिनटेक परिषदेत बोलताना सांगितले.
क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये बरेच संशोधन सुरू आहे, जे साधारण संगणकाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त जटिल समस्या सोडवण्यासाठी क्वांटम मेकॅनिक्सच्या तत्त्वांवर अवलंबून असेल. आगामी काळात ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ तंत्रज्ञान येण्याची शक्यता आहे आणि एकदा ते आले की, ‘पासवर्ड’ सुरक्षित मानले जाणारे क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानालाही निरस्त केले जाऊ शकते.
तंत्रज्ञानाच्या स्वीकारार्हतेबद्दल बोलताना पांडे म्हणाले की, ही प्रक्रिया निरंतर सुरू असून, आधुनिक आणि सुरक्षित प्रणालीचा वापर केला जात आहे. पूर्वी कागदी स्वरूपात असलेले समभाग आता डीमटेरियलायझेशनच्या (डीमॅट) माध्यमातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात हस्तांतरित करण्यात येत आहेत. गुंतवणूकदार समुदायाच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे आणि जे जे नवे ते स्वीकारले पाहिजे, अशी नियामक म्हणून पांडे यांनी भूमिका मांडली.
क्वांटम कॉम्प्युटिंग म्हणजे काय?
क्वांटम कॉम्प्युटिंग मेकॅनिक्सच्या तत्त्वांचा वापर करून, जटिल गणना करते, अगदी साध्या संगणकांपेक्षा वेगाने हे घडून येते. ज्यामुळे क्वांटम संगणक एकाच वेळी अनेक शक्यता पडताळू शकतात. हे तंत्रज्ञान सध्या सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरसाठी देखील अशक्य असलेल्या समस्या सोडवण्यास सज्ज आहे, ज्याचा वापर औषध, जटिल शोध, साहित्य विज्ञान, वित्त आणि क्रिप्टोग्राफीसारख्या गुंतागुंतीच्या प्रयोगांमध्ये शक्य आहे.