मुंबई: गुरुवारच्या सत्रातील तीव्र तेजीनंतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या नफावसुलीमुळे आणि निर्देशांकातील वजनदार कंपनी भारती एअरटेलच्या समभागामधील घसरणीने सेन्सेक्स आणि निफ्टी नकारात्मक पातळीवर सप्ताहसांगतेच्या सत्राला निरोप दिला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २००.१५ अंशांनी घसरून ८२,३३०.५९ पातळीवर शुक्रवारी दिवसअखेरीस स्थिरावला. दिवसभरात त्याने ३८३.७९ अंश गमावत ८२,१४६.९५ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ४२.३० अंशांची घसरण झाली आणि तो २५,०१९.८० पातळीवर बंद झाला. साप्ताहिक आघाडीवर, सेन्सेक्सने २,८७६.१२ अंशांची म्हणजेच ३.६१ टक्क्यांची कमाई केली आहे, तर निफ्टीने १,०११.८ अंश म्हणहेच ४.२१ टक्क्यांची भर घातली आहे.
माहिती-तंत्रज्ञान, बँकिंग आणि धातू क्षेत्रातील निवडक कंपन्यांमध्ये नफावसुली झाली. मात्र व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड आणि स्मॉलकॅप या सारखे निर्देशांक आणि बहुतेक क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले. जागतिक अनिश्चितता असूनही गुंतवणूकदार भांडवली बाजाराबाबत आशावादी आहेत, असे मत मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे यांनी व्यक्त केले.
सिंगटेलने भारती एअरटेलमधील सुमारे १.२ टक्के हिस्सेदारी १.५ अब्ज डॉलरला विकल्यानंतर भारती एअरटेलच्या समभागात २.८१ टक्क्यांची घसरण झाली. त्यापाठोपाठ एचसीएल टेक, स्टेट बँक, इन्फोसिस, टेक महिंद्र, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, महिंद्र अँड महिंद्र आणि टायटन या समभागांत घसरण झाली. तर इटर्नल, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, आयटीसी, टाटा मोटर्स आणि एनटीपीसीचे समभाग तेजीसह स्थिरावले.
भांडवली बाजारात गुंतवणूकदारांमध्ये उत्साह कायम असला तरी ते सावधगिरी बाळगून आहेत. गृहनिर्माण, वाहन निर्मिती, ग्राहकोपयोगी वस्तू या सारख्या व्याजदराबाबत संवेदनशील क्षेत्रांमध्ये तेजी कायम आहे.
विनोद नायर, संशोधन प्रमुख, जियोजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
सेन्सेक्स ८२,३३०.५९ २००.१५ (-०.२४%)
निफ्टी २५,०१९.८० ४२.३० (-०.१७%)
तेल ६४.५९ ०.०९
डॉलर ८५.५३ -१ पैसा