मुंबई : भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत संभाव्य आशावाद, एप्रिलमध्ये विक्रमी वस्तू-सेवाकर संकलन आणि परदेशी निधीच्या अविरत ओघामुळे शुक्रवारी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह स्थिरावले. शिवाय, जागतिक भांडवली बाजारांमधील मजबूत कल देखील देशांतर्गत आघाडीवर आशावादात भर घालत होता.

शुक्रवारी सकाळच्या सत्रातील तीव्र तेजीनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २५९.७५ अंशांनी वधारून ८०,५०१.९९ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात, त्याने ९३५.६९ अंशांची कमाई करत ८१,१७७.९३ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. मात्र त्या उच्चांकापासून तब्बल ६७५ अंश गमावत तो बंद झाला. अस्थिर बाजारात राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक अवघ्या १२.५० अंशाच्या वाढीसह २४,३४६.७० पातळीवर बंद झाला.

अमेरिका आणि भारत यांच्यातील संभाव्य व्यापार कराराच्या वाढत्या अपेक्षा असूनही, नियंत्रण रेषेवरील वाढत्या तणावामुळे बाजारातील तेजी ओसरली. शिवाय अलिकडच्या भांडवली बाजारातील तेजीमुळे माहिती तंत्रज्ञान, बँकिंग आणि इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नफावसुली झाली. चौथ्या तिमाहीतील कंपन्यांच्या मंदावलेल्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तरीही, अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटीला मिळालेली गती आणि कमकुवत डॉलर हे मध्यम कालावधीत भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक ठरले आहे.

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, स्टेट बँक, मारुती, टाटा मोटर्स, आयटीसी, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर नेस्ले, एनटीपीसी, कोटक महिंद्र बँक, पॉवर ग्रिड आणि टायटनच्या समभागात घसरण झाली.

सेन्सेक्स ८०,५०१.९९ २५९.७५ ( ०.३२%)

निफ्टी २४,३४६.७० १२.५० ( ०.०५%)

तेल ६१.६२ – ०.८२

डॉलर ८४.५३ -१ पैसा