मुंबई : भांडवली बाजाराला अनिश्चिततेचे ग्रहण लागले असून, सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात नफावसुलीसाठी झालेल्या समभागांच्या विक्रीमुळे निर्देशांक घसरले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदरविषयक निर्णय येत्या बुधवारी अपेक्षित असून, त्या आधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा धारण केल्याचे दिसून येते.

शुक्रवारच्या सत्रातील सेन्सेक्समधील ४१६ अंशांच्या घसरणीनंतर, सप्ताहारंभीच्या व्यवहारांतही प्रारंभिक टप्प्यांत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ३६० हून अधिक अंशांच्या घसरगुंडीसह ६२,५०७ या दिवसातील नीचांकी पातळीपर्यंत रोडावला होता. तथापि, उत्तरार्धात तेजीवाल्यांच्या सक्रियतेने तो सावरला आणि ३३.९ अंश (०.०५ टक्के) अशा माफक घसरणीसह सेन्सेक्स ६२,८३४.६० वर दिवसअखेरीस स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकाने प्रत्यक्षात ४.९५ अंश (०.०३ टक्के) अशी नाममात्र वाढ दर्शवत, १८,७०१.०५ या पातळीवर दिवसाच्या व्यवहाराला निरोप दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भरधाव तेजीत असलेल्या माहिती-तंत्रज्ञान आणि तेल व वायू समभागांसह, व्याजदराबाबत संवेदनशील असलेल्या वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये सोमवारच्या व्यवहारात नफावसुलीसाठी विक्री झाल्याचे दिसून आले. सोमवारच्या व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डीज, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या समभागांचे मूल्य रोडावल्याचा फटका सेन्सेक्सच्या वाढीला बसला.