मुंबई: वित्तीय, दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमधील दमदार खरेदीच्या जोरावर, शुक्रवारी भांडवली बाजारात चैतन्य संचारलेले दिसून आले. युद्धाचे ढग दाटलेल्या पश्चिम आशियात लष्करी हस्तक्षेप लांबवण्यासह, अमेरिकेची इराणशी चर्चा होण्याच्या शक्यतेतून निर्माण झालेल्या आशावादाने हा उलटफेर घडवून आणला आणि त्यापायी सलग तीन सत्रातील घसरणीपासून निर्देशांकांनी फारकत घेतली.

युद्धाचा तणाव कमी होण्याच्या संकेतांनी जगभरातील बाजारातील गुंतवणूकदारांना दिलासा दिला. खनिज तेलाच्या किमती जवळपास २ टक्क्यांनी गडगडल्या. या सकारात्मकतेचा आधार घेत आणि परकीय भांडवलाच्या नव्याने सुरू झालेल्या प्रवाहामुळे शुक्रवारी सेन्सेक्स-निफ्टीला मोठी मुसंडी घेण्याचे बळ मिळवून दिले. सपाटीवरच सुरुवात केल्यानंतर, सेन्सेक्सने उत्तरार्धात उत्साही झेप घेत दिवसअखेर १,०४६.३० अंशांच्या (१.२९ टक्के) कमाईसह ८२,४०८.१७ पातळीवर विश्राम घेतला. दिवसभरात तो १,१३२.६२ अंशांनी वाढून ८२,४९४.४९ पातळीपर्यंत उंचावला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३१९.१५ अंशांनी (१.२९ टक्के) वाढून २५,११२.४० वर स्थिरावला.

सरलेल्या आठवड्यात, सेन्सेक्सने १,२८९.५७ अंशांनी आणि निफ्टीने ३९३.८ अंशांनी वाढ साधली आहे. दोन्ही निर्देशांकांतील साप्ताहिक वाढ ही दीड टक्क्यांहून अधिक राहिली. गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ९३४.६२ कोटी रुपये मूल्याची समभाग खरेदी केली, हा क्रम शुक्रवारच्या सत्रातही त्यांनी कायम ठेवला.

इराणशी अमेरिकेची चर्चा होण्याची अपेक्षा असल्याने, त्याचा इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धात तात्काळ लष्करी हस्तक्षेपाचा धोकाही निवळला आहे. किंबहुना पुढील दोन आठवड्यात या संबंधाने ठरविले जाईल, असे व्हाइट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले. या घडामोडीमुळे खनिज तेलाच्या पिंपामागे ८० डॉलरच्या पातळीला भिडू पाहत असलेल्या किमतीत सुधारणा झाली. तेलाच्या किमती नरमण्याचा देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल या भावनेसह, परदेशी गुंतवणूकदारांच्या सक्रियतेने बाजारातील खरेदीचा उत्साह दुणावला, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

सेन्सेक्समध्ये सामील कंपन्यांपैकी मारुती सुझुकी हा एकमेव समभाग पिछाडीवर राहिला. निफ्टीतील ५० पैकी ४६ कंपन्यांचे समभाग वधारले, तर केवळ चार घसरणीत राहिले. व्यापक बाजारात खरेदीचा चांगला बहर दिसून आला. परिणामी मुंबई शेअर बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक वरच्या पातळीवर बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.२० टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५५ टक्क्यांनी वाढला. मुंबई शेअर बाजारातील २,४६३ समभाग वधारले, तर १,४८४ समभाग घसरणीत राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिल्या तिमाहीच्या निकालांवर लक्ष

बाजाराचे लक्ष आता २०२५-२६ आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीतील कंपन्यांच्या निकालांकडे लागले आहे. विशेषत: वित्त, वाहन आणि स्थावर मालमत्ता उद्योगासारख्या व्याजदराबाबत संवेदनशील क्षेत्राला ताज्या कपातीचे फायदे, तसेच चलनवाढीचा सैल झालेला ताण आणि लोकांच्या क्रयशक्तीत वाढीसाठी केंद्राने दिलेल्या प्राप्तिकरात सवलतींचा ग्राहक-केंद्रित उपभोग-वस्तू क्षेत्रावरील सुपरिणामांची चाचपणी या निकालातून केली जाईल.