मुंबईः कर्ज वितरणात उत्साहवर्धक वाढीचे सप्ताहाअखेरीस जाहीर आकडेवारीने बँकांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने आठवड्याची सुरूवात सेन्सेक्स-निफ्टीने तेजीने केली. बँकिंग निर्देशांकाची चांगली कामगिरी, त्याचप्रमाणे आयटी आणि हॉस्पिटल समभागांना मिळालेली मागणीमुळे सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजाराने सकारात्मक वाढ नोंदविली. शुक्रवारी, ३ ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात देखील निफ्टी आणि सेन्सेक्स प्रत्येकी १ टक्क्यांनी वाढले होते.

आजच्या शेअर बाजारातील व्यवहाराचे वैशिष्ट्य म्हणजे, निफ्टी निर्देशांकाने तांत्रिक आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या २५ हजारांच्या पातळीला गाठले. निफ्टी १८३.४० अंशांनी किंवा ०.७४ टक्क्यांनी वाढून २५,०७७.६५ पातळीवर दिवसअखेर बंद झाला. तर बाजार बंद होताना, सेन्सेक्स ५८२.९५ अंशांनी किंवा ०.७२ टक्क्यांनी वाढून ८१,७९०.१२ पातळीवर विसावला. सोमवारच्या पाऊण टक्का तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ३ लाख कोटी रुपयांची भर पडली असल्याचा शक्यता आहे.

बाजारातील तेजीचे वळण कशामुळे?

बड्या व्यापारी बँकांनी मजबूत तिमाही कर्ज वाढीचे अहवाल जाहीर केले. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीनंतरही बँकांच्या कर्ज मागणीत अपेक्षेप्रमाणे वाढ नव्हती. तथापि ताज्या जाहीर आकड्यांनी हे चित्र बदलत असल्याचा दिलासा शेअर बाजार गुंतवणूकदारांना दिला. परिणामी आकर्षक मूल्यांकन असलेल्या बँकांच्या समभागांत सोमवारी दमदार खरेदी झाली आणि बँकिंग निर्देशांकाने चांगली कामगिरी केली.

क्षेत्रनिहाय १६ प्रमुख निर्देशांकांपैकी सात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली, ज्यामध्ये खासगी बँका आणि वित्तीय संस्थांनी प्रत्येकी १.२ टक्के वाढ नोंदवली. खासगी बँकांच्या निर्देशांकात, कोटक महिंद्र बँकेत १.५ टक्के वाढ झाली, जी या क्षेत्रातील सर्वात जास्त वाढ आहे आणि निफ्टी निर्देशांकातील सर्वात जास्त वजन असलेला शेअर एचडीएफसी बँकेत ०.६ टक्के वाढ झाली. दोन्ही बड्या खासगी बँकांनी सप्टेंबर तिमाहीत कर्ज वितरणात अनुक्रमे १५ टक्के आणि १० टक्के वाढ नोंदवली आहे.

अन्य क्षेत्रांमध्ये, आयटी निर्देशांक २ टक्के, आरोग्यसेवा निर्देशांक १ टक्के, तेल आणि वायू निर्देशांक ०.७ टक्के आणि पीएसयू बँक निर्देशांक ०.४ टक्के वाढला, तर धातू, मीडिया, एफएमसीजी निर्देशांक ०.३ टक्के ते ०.९ टक्के या दरम्यान घसरले.

केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेअंतर्गत (सीजीएचएस) केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी रुग्णालयांमध्ये विविध वैद्यकीय प्रक्रिया आणि उपचारांसाठी निश्चित केलेले खर्च अर्थात सीजीएचएस दर केंद्राने वाढविले. परिणामी हॉस्पिटलशी संलग्न शेअरमध्ये वाढ झाली.

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारा बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.७ टक्के वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ घसरला. मुंबई शेअर बाजारातील सुमारे १७१५ शेअर्स वधारले, तर २३७० शेअर्स घसरले आणि १५४ शेअर्सच्या भावात कोणताही बदल झाला नाही.