Sensex Today Latest Update: गेल्या आठवड्याभरापासून गुंतवणूकदारांवर अक्षरश: रुसलेला मुंबई शेअर बाजार सोमवारी काहीसा तेजीत आला आणि गुंतवणूकरादारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. गेल्या सलग सात सत्रांमध्ये सातत्याने घसरण नोंदवलेल्या सेन्सेक्सनं आज उसळी घेतली. त्यापाठोपाठ निफ्टी५० नंही नेहमीप्रमाणे सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल ठेवत सकारात्मक वाढ नोंदवली. त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सोमवारी पहिल्या सत्राचे व्यवहार सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.

सेन्सेक्स-निफ्टी एकसाथ!

सेन्सेक्स आणि निफ्टीनं घसरण होणं किंवा वधारणं एकसाथच करण्याचा आपला कल सोमवारी पहिल्या सत्रातही कायम ठेवला. सोमवारी सेन्सेक्स बाजार उघडताच चक्क ८०२ अंकांनी वर गेला. त्यामुळे सकाळी ११ पर्यंत सेन्सेक्सनं ७८,८४४.२५ चा टप्पा गाठला होता. त्यापाठोपठ निफ्टी५० नंही २४३ अंकांची वाढ नोंदवत २३,८२८.६९ अंकांपर्यंत मजल मारली होती.

कुणी दिला मदतीचा हात?

दरम्यान, गेल्या ६ ते ७ सत्रांमध्ये सातत्याने घसरण पाहणाऱ्या सेन्सेक्सला वर आणण्यात बँकिंग, वित्तसेवा आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्सनं मदतीचा हात दिला. याशिवाय मेटल उद्योग आणि रिअॅल्टी उद्योगांच्या समभागविक्रीनंदेखील या घडामोडींमध्ये मोठा वाटा उचलला. आज चांगली कामगिरी करणाऱ्या शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश होता. या दोन्हींच्या शेअर्सनं तब्बल १.७ टक्क्यांची वाढ नोंदवली. त्याशिवाय जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, टेक महिंद्रा आणि विप्रो या कंपन्यांच्या शेअर्सलाही चांगला दर मिळाला.

Sensex: मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक बाजारपेठेतील घडामोडी

दरम्यान, जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचाही सोमवारी भारतीय शेअर मार्केटवर परिणाम पाहायला मिळाला. अमेरिकेतली दरवाढ नियंत्रणात राहणार असल्याचे अंदाज जाहीर झाल्यानंतर आशियाई बाजारपेठांमध्ये त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. जपानमधील बाजारात १.३ टक्क्यांची वाढ दिसून आली.