मुंबई : माहिती-तंत्रज्ञान अर्थात आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये गुतवणूकदारांनी लावलेल्या खरेदीच्या सपाट्यामुळे सलग पाचव्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २१३ अंकांनी वधारला. तर सलगपणे हुलकावणी देत असलेल्या २५ हजारांच्या पातळीपुढे बंद नोंदविण्यास निफ्टी निर्देशांक यशस्वी ठरला.

बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २१३.४५ अंशांनी वधारून ८१,८५७.८४ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ३४१.२३ अंशांची कमाई करत ८१,९८५.६२ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ६९.९० अंशांची वाढ झाली आणि तो २५,०५०.५५ पातळीवर बंद झाला.

सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या जॅक्सन होल परिषदेमधील आगामी भाषणाकडे लागले आहे. त्या भाषणांतून ‘फेड’च्या आगामी बैठकीत संभाव्य व्याजदर कपात प्रत्यक्षात होईल की नाही याचे संकेत मिळतील.

देशांतर्गत वाढती गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेविषयक अनुकूल आकडेवारीमुळे भारतीय भांडवली बाजाराची सकारात्मक गती कायम आहे. मात्र, समभागांचे उच्च मूल्यांकन आणि बाह्य जोखीम, विशेषतः अमेरिकेने लादलेले आयात शुल्क आणि रशियाच्या खनिज तेल खरेदीवरील निर्बंध हे घटक बाजारासाठी आव्हाने निर्माण करत आहेत.

म्हणूनच, अमेरिकेच्या व्यापार धोरणासंदर्भात अनिश्चितता कायम असेपर्यंत गुंतवणूकदारांची सावध भूमिका कायम राहिल. गुंतवणूकदारांचे लक्ष आता या आठवड्याच्या शेवटी होत असेलेले जेरोम पॉवेल यांचे भाषण आणि फेडरल रिझर्व्ह भविष्यातील धोरण दिशेवर असेल, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये, इन्फोसिस सर्वाधिक ३.८८ टक्क्यांनी वधारला, त्या पाठोपाठ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस २.६९ टक्क्यांनी वधारला. हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, टाटा स्टील, टेक महिंद्र आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या समभागांची कामगिरी देखील चमकदार राहिली.

मात्र, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स आणि ट्रेंट यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.

सेन्सेक्स ८१,८५७.८४ २१३.४५ ( ०.२६%)

निफ्टी २५,०५०.५५ ६९.९० ( ०.२८%)

तेल ६६.५४ १.१४%

डॉलर ८७.०७ -६ पैसे