लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबई : सरलेल्या जुलै महिन्यात समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीच्या प्रवाहात १२ टक्के घसरण झाली आणि तो ७,६२६ रुपयांवर सीमित राहिला. मात्र म्युच्युअल फंड हा गुंतवणूकपर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीची अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, सरलेल्या महिन्यांत त्यायोगे विक्रमी १५,००० कोटींहून अधिक गुंतवणूक आल्याचे आढळून आले.
जुलै महिन्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून १५,२४५ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, तर त्याआधीच्या महिन्यात म्हणजेच जूनमध्ये १४,७३५ कोटी रुपयांचा ओघ आला होता. समभागसंलग्न म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीत किरकोळ घसरण होऊनही, जुलैमध्ये सलग २९व्या महिन्यात या फंडांमध्ये गुंतवणुकीचा प्रवाह सकारात्मक राहिला. जुलैमध्ये, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २.८० टक्क्यांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात २.९४ टक्क्यांची भर पडली.
हेही वाचा – आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास व्याजदर जैसे थे ठेवण्याची अपेक्षा, तज्ज्ञ काय म्हणतात?
‘ॲम्फी’द्वारे जाहीर मासिक आकडेवारीनुसार, निश्चित उत्पन्न श्रेणीमध्ये (फिक्स्ड इन्कम), डेट फंडातील गुंतवणूक जुलैमध्ये चार पटीने वाढून ६१,४४० कोटी रुपयांवर पोहोचली. लिक्विड आणि मनी मार्केट फंडांनी अनुक्रमे ५१,९३८ कोटी आणि ८,६०८ कोटींचा निव्वळ प्रवाह पाहिला. तर जूनच्या सुरुवातीला, शेअर बाजारातील तेजीमुळे ओपन-एंडेड इक्विटी फंडातील गुंतवणूक सुमारे १६७ टक्क्यांनी वाढून ८,६३७ कोटी रुपयांवर पोहोचली होती. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल कॅप आणि मिडकॅप फंड योजनांमध्ये गुंतवणुकीचा प्रवाह कायम राखला आहे. याआधी केवळ २०२१ मधील फेब्रुवारी आणि सप्टेंबर महिन्यात त्यातून गुंतवणूक काढून घेण्यात आली होती.
गंगाजळी ४६.११ लाख कोटी रुपयांवर
म्युच्युअल फंड घराण्यांकडील एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) अर्थात गंगाजळी ही जुलैमध्ये ४.५० टक्क्यांनी वाढून ४६.११ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील महिन्यात सर्व फंड घराण्यांकडे जमा मालमत्ता ४४.१२ लाख कोटी रुपये होती.
किरकोळ गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंडातील स्वारस्य वाढल्यामुळे सर्व श्रेणींमध्ये गुंतवणूक ओघ वाढत आला आहे. समभागसंलग्न फंडाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता आणि एकूण फोलिओंच्या संख्येतही भर पडली आहे. सरलेल्या महिन्यात ३३.०६ लाख नवीन खाती जोडली गेली, तर व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वार्षिक आधारावर २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. – एन. एस. व्यंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘ॲम्फी’