मुंबई: शेअर बाजार निर्देशांकांनी शुक्रवारी मोठ्या घसरणीने आठवड्याला निरोप दिला. अमेरिकी डबल टॅरिफची टांगती तलवार, व्यापार अनिश्चितता आणि कंपन्यांची मंदावलेली मिळकत कामगिरी हे घटक गुंतवणूकदारांच्या भावना कमकुवत बनवत आहेत. देशांतर्गत वित्तसंस्था आणि म्युच्युअल फंडांकडून सुरू असलेली खरेदीही सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांना मोठ्या घसरणीपासून वाचवू शकलेली नाही. सेन्सेक्स ७६५.४७ अंशांनी व निफ्टी २३२.८५ अंशांनी घसरले असून गुंतवणूकदारांचे तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अधिक लक्षणीय बाब म्हणजे शेअर बाजाराला नेमकी दिशा निश्चित करता आलेली नाही. त्यामुळे मध्येच एकाद दिवशी सेन्सेक्स उसळताना दिसत असला तरी एकंदर कल हा मंदीचाच आहे. याचा पुरावा म्हणजे सलग सहाव्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीची घसरण मालकी सुरू राहिली असून, मागील दोन वर्षांत युक्रेन-रशिया, इराण-इस्त्रायल युद्ध आणि अमेरिका -चीन व्यापार तणाव असतानाही जे घडले नाही ते आता घडताना दिसले आहे. याचा ताण म्हणून भारताचे चलन रुपयाचे मूल्यही डॉलरच्या तुलनेत सलग पाचव्या आठवड्यात गडगडले आहे.
घसरगुंडी किती आणि कशामुळे?
परदेशी गुंतवणूकदारांच्या अविरत सुरू राहिलेल्या विक्रीमुळे आणि ट्रम्प करवाढीशी संबंधित गोंधळामुळे शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी दणदणीत आपटले. एनएसई निफ्टी आणि बीएसई सेन्सेक्स दोहोंमध्ये प्रत्येकी जवळपास १ टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स ७६५.४७ अंशांच्या नुकसानीसह ७९,८५७.७९ वर स्थिरावला. तर निफ्टी २३२.८५ अंशांनी घसरून २४,३६३.३० वर बंद झाला. आठवड्यात दोहोंमध्ये अनुक्रमे ०.८ टक्के आणि ०.९ टक्के घसरण झाली. एप्रिल २०२० नंतरचा हा निर्देशांकांचा सर्वात मोठा साप्ताहिक तोटा आहे.
आठवड्याच्या शेवटच्या १६ पैकी १३ प्रमुख उद्योग क्षेत्रांत घसरण झाली. व्यापक बाजारात घसरणीची मात्रा अधिक मोठी होता. परिणामी स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप निर्देशांक अनुक्रमे १.४ टक्के आणि १.१ टक्के गडगडले. अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर मदार असलेल्या आयटी आणि फार्मा निर्देशांक अनुक्रमे ०.७ टक्के आणि २.८ टक्के असे सर्वाधिक घसरले, तर वित्तीय आणि ऊर्जा क्षेत्र अनुक्रमे १.२ टक्के आणि १.४ टक्क्यांनी घसरले.
गुरुवारी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून भारताच्या तेल आयातीचा हवाला देत, टॅरिफ दुप्पट करून ५० टक्के अथवा त्याहून अधिक करण्याच्या निर्णयाचा पुनरूच्चार केला. गंभीर बाब म्हणजे वाढीव भार हा २१ दिवसांनी म्हणजेच २७ सप्टेंबरपासून लागू होणार असला तरी त्यांच्या अपेक्षेनुरूप वाद मिटल्याशिवाय पुढील चर्चा, वाटाघाटीचे मार्गही बंद असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले.
शुक्रवारच्या मोठ्या घसरणीमागे आणखी एक पैलू ट्रस्ट म्युच्युअल फंडाचे मुख्याधिकारी संदीप बागला यांनी पुढे आणला. ते म्हणाले, आता अर्थव्यवस्थेने पतविषयक धोरणात्मक उपाययोजनांमधून वाढीव मदतीची अपेक्षा करू नये असाच रिझर्व्ह बँकेने बुधवारच्या समालोचनांतून संदेश दिला आहे. बाजारात आधीच नकारात्मक बनलेल्या भावना पाहता, गुंतवणूकदार यातून आणखी सावध बनले आहेत. बुधवारी रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले, परंतु अर्थव्यवस्थेला आयात शुल्कासंबंधित जोखीम असल्याचेही नमूद केले.
एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४,९९७.१९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्या उलट, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, १०,८६४.०४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.
वैयक्तिक शेअर्सची कामगिरी कशी?
० वैयक्तिक समभागांमध्ये, अदानी एंटरप्रायझेस या आठवड्यात ७.४ टक्क्यांनी घसरला, ३१ जुलै रोजी निराशाजनक तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर शेअरचा तोटा वाढला आहे.
० अमेरिकेने भारतीय आयातीवरील शुल्क वाढवल्यानंतर केपीआर मिल, गोकलदास एक्सपोर्ट्स, वर्धमान टेक्सटाइल्स आणि ट्रायडंटसह कापड निर्यातदार ४.२ टक्के ते १२.१ टक्क्यांनी गडगडले आहेत.
० या उलट नवागत एनएसडीएलच्या शेअर्सने बुधवारी सूचिबद्धतेनंतर, सलग तिसऱ्या दिवशी तेजीची दौड कायम ठेवत, गुंतवणूकदारांना तीन दिवसांत ५२ टक्क्यांचा लाभ दाखविला आहे.
० हिरो मोटोकॉर्पने आठवड्यात ६.७ टक्के वाढ साधली, एलआयसी, भारती एअरटेलने तिमाही नफ्यात वाढीच्या कामगिरीमुळे ३.२ टक्के वाढ साधली.