तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेअर बाजारातील व्यवहार करणे सोपे झाले आहे. समभागाची खरेदी-विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाचे विविध प्रकारचे व्यवहार केले जातात. काही व्यवहारांमध्ये समभाग खरेदी केले जातात तर काही व्यवहारांमध्ये वायदे स्वरूपाचे करार केले जातात, फ्युचर्स आणि ऑप्शन्स (एफअँडओ). तर ‘इन्ट्राडे’ व्यवहारही पार पडतात आणि या सर्व व्यवहारांवरील कर आकारणी कशी होते हे जाणून घेणे गरजेचे आहे.

‘गुंतवणूक की उद्योग’

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाचे व्यवहार ही गुंतवणूक आहे की उद्योग आहे, यावर समभागाच्या विक्रीवरील कर आकारणी अवलंबून आहे. समभागाचे व्यवहारांवरील उत्पन्न हे गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न म्हणजेच भांडवली नफा या शीर्षकाखाली की उद्योग-व्यवसायातील उत्पन्नमध्ये दाखवायचे हा संभ्रम करदात्यांच्या मनात नेहमी येतो. या दोन्ही प्रकारच्या उत्पन्नावर कर आकारणी भिन्न आहे आणि अनुपालनसुद्धा वेगवेगळे आहे.
जे गुंतवणूकदार समभागामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करतात आणि त्यांचे उद्दिष्ट भांडवली वाढ आणि लाभांश मिळवणे आहे, अशांसाठी समभागाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न भांडवली नफा म्हणून मानले जाते. भांडवली नफ्याच्या अंतर्गत भरावा लागणारा कर सवलतीच्या दरात आहे. जे गुंतवणूकदार अल्पकालीन किमतीच्या चढ-उतारातून नफा मिळविण्याच्या उद्देशाने समभाग वारंवार खरेदी आणि विक्री करतात, अशांसाठी समभागाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून मानले जाते. उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नावर करदात्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्यानुसार कर भरावा लागतो.

जर करदाता उद्योग-व्यवसाय म्हणून हे व्यवहार करत असेल तर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नासाठी असणाऱ्या प्राप्तिकर कायद्यातील सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठी लागू होतात. अशा व्यवहारात तोटा झाला तर तो इतर उत्पन्नातून वजा करण्याच्या तरतुदी वेगळ्या आहेत. उद्योग-व्यवसायाचा तोटा हा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून (पगाराचे उत्पन्न सोडून) वजा करता येतो. दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्प मुदतीचा तोटा हा अल्प किंवा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो. तसेच पुढील वर्षासाठी तोटा ‘कॅरी-फॉरवर्ड’ करण्याच्या तरतुदीसुद्धा वेगळ्या आहेत.

करदात्याने केलेले व्यवहार हे गुंतवणूक आहे की उद्योग यामध्ये दुमत असू शकते. करदात्याने याबाबत घेतलेल्या भूमिकेला प्राप्तिकर अधिकारी आव्हान देऊ शकतो. पूर्वी या बाबतीत न्यायालयाने वेगवेगळे निकष दिले होते. अशा प्रकरणांमध्ये खटले कमी करण्यासाठी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने फेब्रुवारी, २०१६ मध्ये परिपत्रक काढून, करदात्याने शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या समभागाबाबत निवडलेली भूमिका प्राप्तिकर अधिकारी स्वीकारेल असे सूचित केले आहे. परंतु करदात्याने एकदा घेतलेली ही भूमिका पुढील वर्षांमध्येदेखील लागू असेल आणि करदात्याला पुढील वर्षांमध्ये वेगळी भूमिका घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

समभागाच्या व्यवहाराविषयी करदात्याने स्वीकारलेल्या भूमिकेनुसार त्याला विवरणपत्र निवडावे लागेल. करदात्याने समभागाचे उत्पन्न उद्योग-व्यवसाय म्हणून मानले तर त्याला विवरणपत्र फॉर्म ३ मध्ये दाखल करावे लागेल आणि गुंतवणूक म्हणून मानले तर त्याला विवरणपत्र १,२ किंवा ४ (इतर निकष विचारात घेऊन) या फॉर्ममध्ये दाखल करावे लागेल.

इन्ट्राडे, फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफअँडओ)

इन्ट्राडे आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफअँडओ) या व्यवहारांपासून मिळणारे उत्पन्न उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न म्हणून गणले जाते. याचे कारण म्हणजे, हे व्यवहार फक्त नफा मिळविण्याच्या उद्देशाने केले जातात. यामुळे उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नासाठी असणाऱ्या प्राप्तिकर कायद्याच्या सर्व तरतुदी अशा व्यवहारासाठीसुद्धा लागू होतात.

१. इन्ट्राडे व्यवहार : इन्ट्राडे व्यवहारात समभाग ज्या दिवशी खरेदी केले त्याच दिवशी विकले जातात आणि त्याची ‘डिलिव्हरी’ घेतली जात नाही. त्यामुळे हे सट्टा उत्पन्न (स्पेक्युलेटिव्ह) म्हणून करपात्र असते. विवरणपत्रात हे उत्पन्न सट्टा उत्पन्न या शीर्षकाखाली दाखवावे लागते. हे सट्टा उत्पन्न नकारात्मक असेल म्हणजेच तोटा असेल तर हा तोटा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही. असा वजा न झालेला तोटा पुढील ४ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो आणि तो फक्त सट्टा उत्पन्नातूनच वजा करता येतो. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

२. फ्युचर्स आणि ऑप्शन्स (एफअँडओ) : या व्यवहारामध्येसुद्धा समभागाची ‘डिलिव्हरी’ घेतली किंवा दिली जात नसली तरी हे व्यवहार सट्टा उत्पन्न या शीर्षकाखाली गणले जात नाहीत, या व्यवहारातून मिळालेले उत्पन्न सामान्य उद्योग-व्यवसायाचे उत्पन्न म्हणूनच गणले जाते. हे उत्पन्न नकारात्मक असेल म्हणजेच तोटा असेल तर हा तोटा इतर उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नातून, सट्टा उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून (पगाराचे उत्पन्न सोडून) वजा करता येतो, हा तोटा पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो आणि तो उद्योग व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो. यासाठी विवरणपत्र मुदतीत दाखल केले असले पाहिजे आणि हा तोटा विवरणपत्रात दाखविला असला पाहिजे.

भांडवली नफ्यावरील कर आकारणी :

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागाच्या गुंतवणुकीच्या धारणकाळानुसार त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर आकारणी केली जाते. अशा समभागाची विक्री, खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यानंतर केल्यास ती गुंतवणूक दीर्घमुदतीची होते अन्यथा अल्पमुदतीची.

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर विकल्यास त्यावर होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा १,२५,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास त्यावर कर भरावा लागत नाही. आणि हा नफा १,२५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यानंतरच्या रकमेवर १२.५० टक्के (२३ जुलै, २०२४ पूर्वी विकल्यास १० टक्के) कर आकारला जातो. यासाठी अट अशी आहे की, समभागाच्या खरेदी (काही अपवाद वगळता उदा. बक्षीस म्हणून मिळालेले, प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) किंवा कर्मचारी मालकी समभागाद्वारे (ईसॉप) मिळालेले समभाग) आणि विक्रीवर रोखे उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला असला पाहिजे. करदात्याने अशा समभागात गुंतवणूक, १ फेब्रुवारी २०१८ पूर्वी केली असेल तर त्याच्यासाठी दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणण्यासाठी वेगळी तरतूद आहे. अशा समभागाच्या विक्रीवरील भांडवली नफा गणताना त्याचे खरेदी मूल्य पुढील (१) आणि (२) मधील जे जास्त आहे ते (१) समभागाचे खरेदी मूल्य, आणि (२) (अ) ३१ जानेवारी, २०१८ रोजीचे वाजवी बाजार मूल्य आणि (ब) विक्री मूल्य, या (अ) आणि (ब) मधील जे कमी आहे ते. यानुसार खरेदी मूल्य गणून दीर्घ मुदतीचा भांडवली नफा गणावा लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग खरेदी केल्या तारखेपासून १२ महिन्यांच्या आत विकल्यास त्यावर होणाऱ्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर, २३ जुलै, २०२४ पूर्वी विकल्यास १५ टक्के कर आणि २३ जुलै, २०२४ किंवा त्यानंतर विकल्यास २० टक्के आकारला जातो. यासाठीसुद्धा अट अशी आहे की, याच्या व्यवहारावर रोखे उलाढाल कर (एसटीटी) भरला गेला असला पाहिजे. जे करदाते असे व्यवहार करतात त्यांनी हे व्यवहार विवरणपत्रात योग्य सदराखाली दाखविणे गरजेचे असते. प्राप्तिकर खात्याकडे विविध माध्यमातून करदात्याच्या व्यवहारांची माहिती मिळत असते. असे व्यवहार विवरणपत्रात न दाखविल्यास प्राप्तिकर खाते करदात्याला नोटीस पाठवू शकते. प्रवीण देशपांडे pravindeshpande1966@gmail.com