मुंबईः गेले काही दिवस शेअर बाजारात प्रमुख निर्देशांकांच्या घसरणीचे कारण बनलेले माहिती-तंत्रज्ञान अर्थात ‘आयटी’ समभागांतील दिलासादायी तेजीने सोमवारी सेन्सेक्स-निफ्टीला आधार दिला. अमेरिकी मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य व्याजदर कपातीच्या आशेने सप्ताहारंभीच्या सत्रात हा उलटफेर घडवून आणला.

जागतिक शेअर बाजारांतील तेजीमुळे बीएसई सेन्सेक्स ३२९.०६ अंशांनी (०.४० टक्के) वधारला आणि सत्रअखेरीस ८१,६३५.९१ वर स्थिरावला. सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे समभाग वधारले, तर १० कंपन्यांच्या समभागांना तोटा सोसावा लागला. दिवसभरात सेन्सेक्स ४९२.२१ अंशांनी झेपावल्याचेही दिसून आले. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ९७.६५ अंशांनी (०.३९ टक्के) वधारून, २४,९६७.७५ वर दिवसअखेरीस बंद झाला.

सेन्सेक्सला वाढीचे बळ हे मुख्यतः आयटी समभागांनी मिळवून दिले. इन्फोसिसचा समभाग सर्वाधिक ३.०३ टक्क्यांनी वधारला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस २.८५ टक्क्यांनी, एचसीएल टेक २.६ टक्क्यांनी आणि टेक महिंद्रचा समभाग १.३२ टक्क्यांनी वधारला.

येत्या सप्टेंबरमध्ये अमेरिकी ‘फेड’कडून व्याजदर कपातीची अपेक्षा आहे. ‘फेड’चे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी जॅक्सन होल परिषदेतील भाषणांत कपातीचे सुस्पष्ट संकेत दिले. त्यानंतर लगेचच अमेरिकेच्या १० वर्षांच्या रोख्यांच्या परताव्यात घसरण दिसून आल्यामुळे देशांतर्गत बाजारात आशावादाची लाट पसरली. ज्याचे प्रतिबिंब सोमवारच्या दिवसभर सकारात्मक राहिलेल्या व्यवहारांतही उमटले. या अनुकूलतेतून दिसलेल्या तेजीत आयटी निर्देशांकाने चांगली कामगिरी केली.

तेजीला कारण काय?

सर्वोत्तम जागतिक संकेतांमुळे बाजाराने आठवड्याची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली. निर्देशांकात जवळजवळ अर्धा टक्क्यांनी वाढ झाली. जागतिक व्याजदराच्या चिंता कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. पुढील महिन्यात फेडरल रिझर्व्हने संभाव्य दर कपातीचे संकेत दिल्याने, उभरत्या बाजारपेठांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वाढली, अशी सोमवारच्या तेजीची रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) अजित मिश्रा म्हणाले.

सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, सन फार्मा, मारुती, टायटन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमधील वाढीनेही सेन्सेक्स-निफ्टीच्या उभारीला आधार दिला. त्या उलट भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँक हे शेअर्स घसरणीच्या वाटेवर होते. खरेदीचा जोर हा निवडक आयटी समभागांवर जवळज‌वळ केंद्रीत होता. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, बीएसई फोकस्ड आयटी २.३५ टक्क्यांनी वाढला, त्यानंतर आयटी (२.३४ टक्के), टेक (१.६७ टक्के), ऑटो (०.५१ टक्के) आणि ग्राहकोपयोगी वस्तू (०.४६ टक्के) या निर्देशांकांमध्ये तेजीचा असा क्रम राहिला. या व्यतिरिक्त व्यापक बाजारात नरमाईचेच वातावरण होते. परिणामी बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.१० टक्के असा किंचित वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.०२ टक्क्यांच्या नाममात्र घसरणीसह दिवसअखेर स्थिरावला.