नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून म्हणजेच जानेवारी-मार्च तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात २० आधार बिंदूंची आणि पोस्टातील तीन वर्षांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात १० आधार बिंदूंची वाढ करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. इतर सर्व अल्प बचत योजनांचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.

सोमवारपासून (१ जानेवारी) लागू होणाऱ्या सुधारित दरांनुसार, सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवर सध्याच्या ८ टक्क्यांवरून ८.२ टक्के व्याज मिळणार आहे. तर पोस्टातील तीन वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर सात टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आले आहे. मात्र, लोकप्रिय असलेल्या सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदरात केंद्रीय अर्थ मंत्रालयाने कोणताही बदल केलेला नाही आणि ते ७.१ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहेत. एप्रिल २०२० मध्ये पीपीएफचे व्याजदर ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत कमी केले गेले होते आणि तेव्हापासून म्हणजे मागील तीन वर्षांपासून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा >>> २०२३-२४ च्या मूल्यांकन वर्षात प्राप्तिकर रिटर्न भरणाऱ्यांकडून नवा विक्रम, ८ कोटींहून अधिक करदात्यांनी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोस्टातील बचत खात्यावरील व्याजदर देखील ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि किसान विकास पत्रावर व्याजदर अनुक्रमे ७.७ टक्के आणि ७.५ टक्के कायम आहे. तसेच मासिक उत्पन्न योजनेसाठी (एमआयएस) व्याजदरात कोणतीही वाढ केलेली नाही आणि यामुळे गुंतवणूकदारांना त्यावर ७.४ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.

व्याज लाभात वाढ जेमतेमच…

रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत, मे २०२२ पासून रेपो दर २.५ टक्क्यांनी वाढवून ६.५ टक्क्यांवर नेला आहे. परिणामी बँकांना ठेवींवरील व्याजदरही वाढवण्यास प्रवृत्त केले गेले आहे. मात्र बँकांनी ठेवींवरील व्याजदर ज्या प्रमाणात वाढवले, तेवढीही वाढ अल्पबचत योजनांच्या व्याजदरात झालेली नाही.