वृत्तसंस्था, नवी दिल्ली : गेल्या वर्षभरात टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागांचे एकत्रित बाजारमूल्य ७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक घसरले आहे, त्यात २१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्यावर्षी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर टाटा समूहाच्या एकत्रित बाजारभांडवलात मोठी घसरण झाली आहे.

जागतिक स्तरावरील आर्थिक अशांतता, मंदावलेली मागणी आणि टाटा समूहातील विविध क्षेत्रांमधील कंपन्यांपुढे असलेल्या वैयक्तिक आव्हानांमुळे बाजार मूल्यात मोठी घट झाली आहे. टाटा समूहातील कंपन्यांच्या बाजारमूल्यातील घसरण व्यापक बाजार कलाशी (ट्रेंड) सुसंगत आहे. याच काळात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी फक्त ०.८ टक्क्यांनी वधारले आहेत, तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे ४.७ टक्के आणि ५.५ टक्क्यांनी घसरले आहेत

समूहाच्या २३ सूचिबद्ध कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य गेल्या वर्षीच्या ३३.५७ लाख कोटी रुपयांवरून २६.३९ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

सर्वाधिक घसरण तेजस नेटवर्क्सच्या समभागांमध्ये झाली आहे, ज्याचे समभाग ५० टक्क्यांहून अधिक घसरले, त्यानंतर ट्रेंटचा समभाग ४४ टक्क्यांनी आणि टाटा टेक्नॉलॉजीजचा समभाग ३३ टक्क्यांनी घसरला. समूहातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या टीसीएसचे समभाग २९ टक्क्यांनी घसरले आहेत, तर टाटा एलेक्ससी आणि टाटा मोटर्स प्रत्येकी २८ टक्क्यांनी घसरले.

ओरिएंटल हॉटेल्स आणि टीआरएफ २४ टक्क्यांनी घसरले, व्होल्टास आणि टाटा केमिकल्स अनुक्रमे २३ टक्के आणि १८ टक्के घसरले आणि टाटा पॉवर १६ टक्क्यांनी घसरले. टाटा कम्युनिकेशन्स आणि नेल्कोचे समभाग १३ टक्क्यांनी घसरले.

समूहातील वधारले समभाग कुठले?

टाटा समूहातील टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा समभाग वर्षभरात ४१.३ टक्क्यांनी वधारला आहे. त्यापाठोपाठ बनारस हॉटेल्स १४.५ टक्के, टाटा स्टील ८.१ टक्के, द इंडियन हॉटेल ५.२ टक्के तर टायटन कंपनीचे समभाग वर्षभरात २.१ टक्क्यांनी वधारले आहेत.