लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: सध्या अस्तित्वात सर्वात जुन्या योजनांपैकी एक आणि करबचतीसाठी गुंतवणुकीचे साधन म्हणून प्रचलित ‘एसबीआय लाँग टर्म इक्विटी फंडा’ने (एलटीईएफ) नुकताच ३२ वर्षांचा टप्पा पूर्ण केला. या योजनेची सुरुवात ३१ मार्च १९९३ रोजी आयडीसीडब्ल्यू (लाभांश) पर्यायासह करण्यात आली आणि नंतर ७ मे २००७ रोजी त्यात वृद्धी (ग्रोथ) पर्याय खुला करण्यात आला.

सुरुवातीपासून या योजनेतील १०,००० रुपये मासिक एसआयपी गुंतवणुकीचे (एकूण गुंतवणूक ३८.५ लाख रुपये), २८ मार्च २०२५ रोजी मूल्य हे १४.४४ कोटी रुपये झाले आहे. या काळात तिचा वार्षिक सरासरी १७.९४ टक्के चक्रवाढ परतावा राहिला आहे. कर वजावटीचा लाभ देणाऱ्या या योजनेला तीन वर्षांचा वैधानिक कुलुपबंद (लॉक-इन) कालावधी लागू आहे, अर्थात तीन वर्षे पूर्ण होईपर्यंत म्युच्युअल फंडाचे युनिट्स विकता येत नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एसबीआय एलटीईएफ’ने १५ वर्षात १६.०३ टक्के, १० वर्षांत १७.५९ टक्के, पाच वर्षांत २४.३१ टक्के आणि तीन वर्षांत २३.४२ टक्के दराने परतावा दिला आहे, तर त्याच्या ‘बीएसई ५०० टीआरआय’ या मानदंड निर्देशांकाचा याच काळात परतावा अनुक्रमे १४.३० टक्के, १५.१४ टक्के, १७.१७ टक्के आणि १३.८९ टक्के असा आहे. ३१ मार्च २०२५ रोजी योजनेची एकूण मालमत्ता (एयूएम) २७,७३०.३३ कोटी रुपये आहे आणि सप्टेंबर २०१६ पासून तिच्या समभाग गुंतवणुकीचे निधी व्यवस्थापन दिनेश बालचंद्रन हे पाहात आहेत.