कोल्हापूर: यावर्षी वेळेवर आणि चांगला पाऊस सुरू झाल्याने शेतीची कामे सर्वत्र गतीने सुरू असून, या सुवार्तेचा फायदा देशभरात ट्रॅक्टर बाजारपेठेला होत असल्याचे दिसत आहे. शेती हंगामपूर्व मे महिन्यांत देशभरात ट्रॅक्टरच्या मागणीत तब्बल २० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
वर्षभरातील मागणीचा उच्चतम काळ असलेल्या मे महिन्यात देशात तब्बल ९९ हजार ४३० ट्रॅक्टरची विक्री झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल साडेसोळा हजारांची वाढ आहे. चांगला पावसामुळे मशागतींच्या वाढत्या कामामुळे मागणीत ही वाढ झाल्याचे ट्रॅक्टर उत्पादक – विक्री असोसिएशनच्या अहवालाने स्पष्ट केले आहे.
आजवर मे महिन्यातील देशभरातील ट्रॅक्टर खरेदी ही ७५ ते ८० हजारांच्या आसपास होती. मात्र, यंदा प्रथमच देशभर सर्वत्र चांगला आणि वेळेवर पाऊस सुरू झाल्याने ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. ‘ट्रॅक्टर अँड मेकॅनिशन मेकॅनिझेशन असोसिएशन’च्या अहवालात याची दखल घेण्यात आली असून, त्यामागे चांगल्या पावसाचे कारण देण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून मशागतीपासून ते पेरणी, आंतरमशागतीची कामे यासाठी आता जनावरांचा वापर कमी झाला आहे. ती जागा अलीकडे ट्रॅक्टरने घेतली आहे. मात्र, यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते. ही गुंतवणूक वसूल होण्यासाठी ट्रॅक्टरचा पुरेसा वापर आणि कामेही मिळावी लागतात. साधारणत: दुष्काळ किंवा कमी पावसाचे चक्र आले, की त्या वर्षी कामे मिळणार नाहीत हा अंदाज बांधून नवीन ट्रॅक्टर खरेदी थंडावते. त्या उलट पाऊस चांगला झाल्यास मागणी वधारते.
विक्रीत वाढ
चालू वर्षी मे महिन्यात मागणीत वाढीसह, देशभरात तब्बल ९९ हजार ४३० ट्रॅक्टरची विक्री झाली. गेल्यावर्षी मे महिन्यामध्ये देशात ८२ हजार ९३४ ट्रॅक्टरची विक्री झाली होती. यंदा पाऊस चांगला आणि वेळेवर सुरू झाल्यामुळे ट्रॅक्टर विक्रीत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच यंदाचे पाऊसमान पाहता ट्रॅक्टरची ही विक्री आणखी वाढेल, असाही अहवालाचा अंदाज आहे.
सोलापूर, मराठवाड्यात दुप्पट विक्री
यावर्षी मे-जून या दोन्ही महिन्यांत अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस पडला असल्याने शेतीकामांना गती आली आहे. पीक चांगले येईल, अशा अपेक्षेसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे. परिणामी मे महिन्यामध्येच ट्रॅक्टरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळून येते, असे सांगली जिल्हा ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष, संचालक शेखर बजाज यांनी सांगितले. विशेषतः पावसाचे प्रमाण कमी असलेल्या सोलापूर जिल्हा तसेच मराठवाडासारख्या दुष्काळी भागातही यावर्षी मेमध्ये ट्रॅक्टरची दुप्पट विक्री झाली. ऑगस्टनंतर सगळीकडे या मागणीत आणखी वाढ होईल, असाही बजाज यांचा अंदाज आहे.