मुंबई, पुणेः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर २५ टक्के आयात शुल्क लादण्याच्या घोषणेमुळे रत्न आणि आभूषण उद्योगावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशाच्या निर्यात अर्थव्यवस्थेत प्रमुख योगदान असलेल्या क्षेत्रातील एक लाखांहून अधिक नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती गुरुवारी व्यक्त करण्यात आली.
अमेरिकेत विकली जाणे दुरापास्त होणाऱ्या हस्तनिर्मित दागिन्यांच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने यापूर्वी १० टक्के शुल्क लादले होते, तेव्हा या उद्योगातील सुमारे ५०,००० नोकऱ्यांवर परिणाम झाला होता. आता शुल्कवाढीमुळे एक लाखाहून अधिक लोकांच्या उपजिविकेवर परिणाम होण्याची भीती आहे. दागिने उद्योगासाठी ताज्या घडामोडडी खूप दुर्दैवी आहेत, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कॉन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले.
अमेरिकेचे आयात शुल्क १ ऑगस्टपासून लागू झाले असून ते आता १० टक्क्यांवरून २५ टक्के झाले आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, अमेरिका भारतीय रत्ने आणि दागिन्यांसाठी सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे आणि गेल्या आर्थिक वर्षातील अमेरिकेला झालेली निर्यात ९.९ अब्ज डॉलरच्या घरात जाणारी आहे. ऑगस्टअखेरीस होणाऱ्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या फेरीची सध्या प्रतीक्षा केली जात आहे. भारतात येत असलेल्या अमेरिकी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा होण्याची आशा आहे.
ट्रम्प सत्तेत परतल्यानंतर, त्यांच्या व्यापार शुल्काच्या धमक्यांमुळे भारतीय बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. सध्या जरी अमेरिकी निर्यातीवर मोठी मदार असली, तरी आगामी काळात अमेरिकेसोबतच्या व्यापारी घडामोडी मंदावतील अशी अपेक्षा आहे, असे कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह म्हणाले.
कापड निर्यातदारांना झळ
अमेरिका ही कापड आणि वस्त्र निर्यातीसाठी भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तयार कपड्यांच्या १७ अब्ज डॉलरच्या निर्यातीपैकी एकट्या अमेरिकेला ५.६ अब्ज डॉलरची निर्यात भारताकडून होते. व्हिएतनामवर भारतापेक्षा कमी २० टक्के, तर इंडोनेशियावर अमेरिकेने १९ टक्के आयात कर लावला आहे. मात्र वाढीव २५ टक्के आयात शुल्कामुळे भारतीय कापडाचे दर वाढतील, त्या उलट व्हिएतनाम, इंडोनेशिया या प्रमुख स्पर्धकांना आता कमी शुल्काचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. रशियाकडून खनिज तेल आणि लष्करी उपकरणे खरेदी केल्याबद्दल भारतावर अतिरिक्त दंड येणार आहे. अनेक भारतीय वस्त्र निर्यातदारांवर कार्यादेश रद्द केले जाण्याचा ताण किंवा किंमती कमी करण्याचा दबाव येऊ शकतो. तथापि भारतीय निर्यातदार संयुक्त अरब अमिराती, युरोप, जपान आणि कोरियासारख्या पर्यायी बाजारपेठांमध्ये अधिक आक्रमकपणे निर्यात करू शकतो.
‘जीडीपी’ ०.३० टक्के घटणार!
अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्कामुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) ३० आधार बिंदूंची घट होण्याची शक्यता ‘बार्कलेज’ने गुरुवारी व्यक्त केली. देशांतर्गत मागणीवर आधारीत अर्थव्यवस्थेवर याचे लक्षणीय परिणाम संभवत नाहीत. तरी बार्कलेजच्या अंदाजानुसार, भारतीय वस्तूंवरील प्रभावी आयात शुल्क व्यापार-भारित अटींमुळे सुमारे २०.६ टक्क्यांपर्यंत असेल.
भारतातून अमेरिकेला होणारी हिरे, हिऱ्यांचे दागिने आणि कृत्रिम हिरे यांची निर्यात आता २६ ते ३२ टक्क्यांनी महागणार आहे. त्यातून ही निर्यात अव्यवहार्य ठरण्याची भीती आहे. अमेरिकेत आभूषण विक्री व्यवसायात असलेल्या भारतीय कंपन्यांनाही याचा फटका बसणार आहे. – अमित मोडक, मुख्याधिकारी, पीएन गाडगीळ अँड सन्स
सोने निर्यातीसाठी शुल्क जे ५.५ ते ७ टक्के होते ते आता अमेरिकेत ३० टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. पैलू पाडलेल्या हिऱ्यांसाठी आधी शुल्क नव्हते. परंतु, त्यावरही आता २५ टक्के शुल्काची आकारणी होणार आहे. याचा देशातील दागिने निर्यातीला जबर फटका बसेल. – सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अमेरिकेने आयात शुल्कात केलेली वाढ ही भारतीय वस्तूंवर अवलंबून असलेल्या तेथील कंपन्यांसाठी जाचक आहे. अतिरिक्त आयात शुल्काचा फटका दागिने, वस्त्रप्रावरणे, वाहनांचे सुटे भाग, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती क्षेत्रांना बसणार आहे. – एच.पी.श्रीवास्तव, अध्यक्ष, डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर
अमेरिकेला सर्वाधिक निर्यात कशाची?
० अभियांत्रिकी वस्तू : १२.३३ अब्ज डॉलर
० औषधे : ६.३४ अब्ज डॉलर
० इलेक्ट्रॉनिक वस्तू / स्मार्टफोन : ६.७९ अब्ज डॉलर
० रत्ने व आभूषणे : ६.२८ अब्ज डॉलर
० तयार कपडे, कापड : ३.३२ अब्ज डॉलर
(२०२३-२४ मध्ये भारताची एकूण निर्यात सुमारे ८० अब्ज डॉलर)