मुंबई : देशातील आघाडीची लघु वित्त बँक असलेल्या उज्जीवनने विद्यमान वर्षात फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेकडे युनिव्हर्सल बँकिंग परवान्यासाठी अर्ज केला असून डिसेंबरपर्यंत बँकेकडून निर्णय घेतला जाण्याची आशा आहे, असे सोमवारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौटियाल यांनी सांगितले.
उज्जीवन बँकेने रिझर्व्ह बँकेला युनिव्हर्सल बँकिंग परवान्याशी संबंधित आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे आणि सध्या अर्जाचे मूल्यांकन करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरपर्यंत रिझर्व्ह बँक बँकिंग परवान्यासंबंधित अर्जावर निर्णय घेईल, असे नौटियाल यांनी सांगितले. बँकेने आगामी काळात पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून २,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीची योजना असल्याचे सांगितले.
बँकेने आर्थिक वर्ष २०३० पर्यंत आपल्या शाखांचे जाळे १,१५० पर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे. तिच्या ठेवी तिप्पट करण्याचे उद्दिष्ट राखले असून, एकूण कर्जदेखील १ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाही अखेर बँकेकडे एकूण ३८,६१९ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.
उज्जीवनने बिगर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून २००५ मध्ये प्रवासाला सुरुवात केली आणि समाजातील आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटाला परिपूर्ण वित्तीय सेवा प्रदान करून बलशाली बनविण्याचे ध्येय पुढे नेले. वर्ष २०१७ मध्ये उज्जीवनला रिझर्व्ह बँकेकडून लघु वित्त बँकेचा दर्जा प्राप्त झाला होता.