पीटीआय, नवी दिल्ली : भारत आणि ब्रिटनदरम्यान व्यापार, तंत्रज्ञान आणि जीवन विज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यासाठी त्या देशाचे गुंतवणूकमंत्री लॉर्ड डॉमिनिक जॉन्सन यांचे बुधवारी बेंगळूरु येथे आगमन झाले. ब्रिटनमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारताची तंत्रज्ञान राजधानी म्हणून लौकिक मिळविणाऱ्या बेंगळूरु आणि पुण्याला भेट देऊन, तेथील गुंतवणूकदारांसह इन्फोसिस आणि झेन्सार टेक्नॉलॉजीजच्या प्रमुखांच्या भेटीगाठी घेतील, अशी माहिती भारतातील ब्रिटिश उच्चायुक्तांनी दिली.

ब्रिटनमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान ते कृत्रिम प्रज्ञा (एआय) या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. कारण आम्ही युरोपातील आघाडीचे गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून उदयास येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आमच्या मजबूत सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांच्या जोरावर भारतातील गुंतवणूकदार इंग्लंडला पसंती देतात. म्हणूनच पुणे आणि बेंगळूरु या दोन्ही शहरांना पुन्हा भेट देताना आनंद होत असल्याचे लॉर्ड जॉन्सन यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत ही ब्रिटनसाठी कायमच अग्रणी बाजारपेठ राहिली आहे आणि आता लॉर्ड जॉन्सन यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान व्यापार करारासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींना गती मिळण्यास मदत होईल. सध्या भारत आणि  ब्रिटनदरम्यान  मुक्त व्यापार करारासाठी बोलणी प्रगतिपथावर आहे. टनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये जागतिक गुंतवणूक शिखर परिषद-२०२३ पार पडणार असून त्यामध्ये दोनशेहून अधिक कंपन्यांचे मुख्याधिकारी सामील होण्याची आशा आहे.