पीटीआय, नवी दिल्ली

केंद्र सरकारने तांदूळ, गहू, साखरेसह अनेक आवश्यक खाद्यवस्तूंच्या निर्यातीवर बंदी आणि तत्सम निर्बंध आणले, त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कृषी निर्यातीला ४ ते ५ अब्ज डॉलरचा फटका बसेल, असा अंदाज सरकारी अधिकाऱ्यांनी वर्तविला होता. मात्र, केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी निर्बंधांमुळे कृषी निर्यातीत घट होण्याचा दावा सोमवारी साफ फेटाळून लावला.

भारताची कृषी निर्यात सध्या ५० अब्ज डॉलर असून, ती २०३० पर्यंत दुपटीने वाढून १०० अब्ज डॉलरवर जाणे अपेक्षित आहे, असा अंदाज बर्थवाल यांनी सोमवारी व्यक्त केला. ‘इंडसफूड शो २०२४’ या दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या खाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी बर्थवाल यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते.

हेही वाचा >>>अदाणी समूहाचा सिमेंट क्षेत्रातील मोठा करार, ACC ने एशियन काँक्रीट आणि सिमेंटची केली खरेदी

बर्थवाल म्हणाले की, देशाची एकूण निर्यात २०३० पर्यंत २ लाख कोटी डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. आजच्या घडीला भारताची कृषी निर्यात ५० अब्ज डॉलर असून, ती २०३० पर्यंत दुपटीने वाढून १०० अब्ज डॉलरवर जाईल, याची मला खात्री आहे. तयार खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात वाढीला खूप मोठा वाव आहे. याचबरोबर खाद्य प्रक्रिया उद्योगाने आयातदार देशांच्या आवश्यक तांत्रिक मानकांची पूर्तता करण्यावर भर द्यायला हवा. उद्योगांनी गुणवत्ता, दर्जा नियंत्रण, पोषण मूल्य, सेंद्रिय घटक आणि पर्यावरणपूरक पॅकेजिंग या घटकांना प्राधान्य दिले पाहिजे. जागतिक व्यासपीठावर अन्न पोषणाला प्रोत्साहन आणि चिरंतनतेला चालना देणेे तितकेच महत्त्वाचे आहे, असा या कार्यक्रमाचा सूर होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालू आर्थिक वर्षात वाढ होणार

मागील आर्थिक वर्षात देशाची कृषी निर्यात ५३ अब्ज डॉलर होती. चालू आर्थिक वर्षात त्यात आणखी वाढ नोंदविण्यात येणार आहे. काही आवश्यक खाद्यवस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले असले तरी चालू आर्थिक वर्षात एकूण कृषी निर्यात वाढलेली दिसेल, असे बर्थवाल यांनी नमूद केले.