मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांकडून झालेल्या समभाग विक्रीचा मारा आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या भविष्यातील व्याजदर कपातीबाबत स्पष्टता नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण होते.

गुरुवारच्या सत्राअखेर सेन्सेक्स ५९२.६७ अंशांनी घसरून ८४,४०४.४६ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ६८४.४८ अंश गमावत ८४,३१२.६५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टी १७६.०५ अंश गमावत २५,८७७.८५ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, टेक महिंद्र, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्या घसरणीस कारणीभूत ठरल्या.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात २५ आधारबिंदूंची कपात केली, मात्र विद्यमान वर्ष २०२५ मधील ही अखेरची दर कपात असू शकते, असे मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. अमेरिकी डॉलरमधील मजबूतीमुळे भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये समभाग विक्रीचा मारा झाला, असे निरीक्षण जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

घसरणीची प्रमुख कारणे

  • परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री
  • फेडरल रिझर्व्हकडून आगामी दर कपातीबाबत अस्पष्टता
  • रुपयाच्या तुलनेत डॉलर पुन्हा मजबूत