मुंबई : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची आशा आणि नवीन परदेशी निधीचा ओघ यामुळे प्रमुख निर्देशांक बुधवारच्या सत्रात सकारात्मक पातळीवर बंद झाले. सत्राअखेर सेन्सेक्स ३६८.९७ अंशांनी वधारून ८४,९९७.१३ पातळीवर स्थिरावला.
दिवसभरात त्याने ४७७.६७ अंशांची झेप घेत ८५,१०५.८३ या सत्रातील उच्चांकी पातळीवर झेप घेतली. मात्र दिवसअखेर ८५ हजारांच्या पातळीवर टिकून राहण्यास अयशस्वी ठरला. दुसरीकडे निफ्टीने ११७.७० अंशांची भर घातली आणि तो २६,०५३.९० पातळीवर बंद झाला.
आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आणि जागतिक व्यापार गतिमानतेबद्दल सुधारित स्पष्टतेमुळे देशांतर्गत बाजारपेठ मजबूत झाली. भारत-अमेरिका व्यापार चर्चेतील संभाव्य प्रगतीबद्दलच्या आशावादाने भावना आणखी उंचावल्या. फेडचा व्याजदरासंबधी आगामी निर्णय जागतिक बाजारपेठांसाठी एक महत्त्वाची घटना आहे. २५ आधारबिंदूंची दर कपातीची व्यापक अपेक्षा असली तरी, गुंतवणूकदार पुढील दर कपातीसाठी फेडच्या भाष्याचे बारकाईने निरीक्षण करतील, जे बाजाराची आगामी वाटचाल निश्चित करतील, असे मत जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.
सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, टाटा स्टील, सन फार्मा, ट्रेंट आणि एशियन पेंट्स यांची कामगिरी चमकदार राहिली.
तर, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एटरनल, महिंद्र अँड महिंद्र आणि मारुती यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, मंगळवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) १०,३३९.८० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले.
सेन्सेक्स ८४,९९७.१३ ३६८.९७ ( ०.४४%)
निफ्टी २६,०५३.९० ११७.७० ( ०.४५%)
तेल ६४.५५ ०.२३ %
डॉलर ८८.२१ -८ पैसे
