वृत्तसंस्था, नवी दिल्ली : जगातील आघाडीची मोटार उत्पादक टेस्लाने भारतात प्रवेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर आता सरकारने नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या नवीन धोरणानुसार देशात काही प्रमाणात उत्पादन करणाऱ्या वाहन कंपन्यांना आयात शुल्कात लक्षणीय सवलत देण्याचे विचाराधीन आहे.

सरकारच्या नवीन ई-वाहन धोरणामुळे वाहन कंपन्यांना परदेशात संपूर्णपणे उत्पादित झालेल्या मोटारी भारतात केवळ १५ टक्के शुल्कासह आयात करता येऊ शकतील. सध्या ४० हजार अमेरिकी डॉलर आणि अधिक किमतीच्या मोटारींवर १०० टक्के आयात शुल्क आकारले जाते. त्यापेक्षा कमी किमतीच्या इतर मोटारींसाठी आयात शुल्क किमतीच्या ७० टक्के इतके आहे. टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी ‘वाय’ मोटार आहे. तिची अमेरिकेतील करपूर्व किंमत ४७ हजार ७४० डॉलर आहे. टेस्लाच्या भारतात येण्याच्या प्रस्तावावर सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परदेशी ई-मोटारींवरील आयात शुल्क सरकारने १५ टक्क्यांपर्यंत कमी केल्यास टेस्ला तिची सर्व मॉडेल भारतात विकू शकेल. टेस्लाच्या भारतात उत्पादित होणार मोटारीचाही यात समावेश असेल. इतरही अनेक देशांनी ई-वाहन उद्योगाला गती देण्यासाठी असे निर्णय घेतले आहेत. इंडोनेशियाने देशात गुंतवणूक करणाऱ्या परदेशी वाहन कंपन्यांसाठी आयात शुल्क ५० टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर आणले होते. यामुळे टेस्लासह चिनी कंपन्या इंडोनेशियात दाखल झाल्या आहेत.