Aadhaar Card Benefits in India: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे प्रदान केलेला १२ अंकी क्रमांक म्हणजे आधार कार्ड होय. आयरिस स्कॅन, फिंगरप्रिंट्स आणि फोटो यासारखी विविध माहिती आधार कार्डवर असते. आज आधार कार्ड भारतीयांसाठी महत्त्वाचा दस्ताऐवज आहे.
विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून ते ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर केला जातो. आज जवळजवळ सगळ्यांकडे आधार कार्ड आहे. पण, याचे नेमके काय फायदे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊयात, आधार कार्डचे सामान्य व्यक्तीसाठी काय फायदे आहेत.
आधार कार्डचे फायदे काय आहेत?
१. सरकारी योजनांचा लाभ
सरकारकडून मिळणारे अनुदान, पेन्शन, स्कॉलरशिपचे पैसे आधार नंबरचा वापर करून थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. आधार नंबरमुळे लाभार्थ्यांना हे पैसे वेळेत मिळतात. देशातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रहिवाशांना आधार कार्ड वापरून विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यास आधार नंबरचा उपयोग होतो.
सरकारकडे आधीच एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल आधार कार्डद्वारे सर्व आवश्यक माहिती उपलब्ध असल्याने, विविध अनुदाने किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीला तिचे आधार कार्ड सादर करावे लागेल.
अशा कोणत्या सरकारी योजना आहेत, ज्यामध्ये आधार नंबर महत्त्वाची भूमिका निभावते, याची काही उदाहरणे पाहूयात.
आरोग्यसेवा
- जनश्री विमा योजना
- आम आदमी विमा योजना
- राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना
रोजगार
- इंदिरा आवास योजना
- स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना
- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ((PMEGP)
अन्न आणि पोषण योजना
- सार्वजनिक वितरण व्यवस्था
- मध्यान्ह भोजन
- एकात्मिक बाल विकास योजना
- अन्न सुरक्षा
शिक्षण
- सर्व शिक्षा अभियान (SSA)
इतर
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना
- जननी सुरक्षा योजना
२. बँक खाते उघडणे
बँक खाते उघडताना आधार कार्डचा उपयोग होतो. एखादी व्यक्ती जेव्हा बँकेत नवीन खाते उघडत असते, त्यावेळी बँका तसेच इतर वित्तीय संस्था आधार कार्ड हे ओळखीचा व पत्ता याचा पुरावा म्हणून वैध मानतात. याबरोबरच, केवायसी (KYC)साठीदेखील आधार कार्डचा उपयोग होतो.
३. आर्थिक गुंतवणूक
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. याबरोबरच, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तसेच पत्त्याचा वैध पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारले जाते.
४. पासपोर्ट
पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया ही दीर्घ काळ चालणारी असते. मात्र, आधार कार्डमुळे ही प्रक्रिया सोपी झाली आहे. आता ज्यांना पासपोर्ट काढायचा असेल, ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. तसेच आधार कार्ड हे रहिवासी तसेच ओळखीचा पुरावा म्हणून अर्जाबरोबर जोडू शकतात. नवीन सरकारी नियमानुसार पासपोर्ट मिळविण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे. फक्त दहा दिवसांत पासपोर्ट दिला जाईल. नवीन नियमांनुसार पोलिस पडताळणी नंतर केली जाऊ शकते.
५. पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाण सर्टिफिकेट (Digital Life Certificate)
पेन्शनधारकांना जीवन प्रमाण सर्टिफिकेट म्हणजे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देण्यात येते. याद्वारे पेन्शनधारकांना त्यांच्या घरीच पेन्शन पोहोचवण्याची सुविधा करण्यात आली आहे. आधार कार्ड नंबरवर जे तपशिल आहेत, त्याप्रमाणे ही पेन्शन त्यांना घरपोच मिळावी, असा जीवन प्रमाण सर्टिफिकेटचा हेतू आहे.
६. जन धन योजना
जन धन योजना ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आली आहे. शून्य शिल्लक असताना व्यक्ती पीएम जन धन खाते उघडू शकते. हे खाते उघडण्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्डची गरज लागते.
७. ओळखीचा पुरावा
आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकते. पॅन कार्डसारख्या इतर ओळखपत्रांशी आधार कार्ड जोडले गेले आहे, त्यामुळे ओळखीचा, रहिवासी, पत्ता, वय या सगळ्याचा पुरवा म्हणून आधार कार्ड स्वीकारले जाते अथवा आधार कार्ड सादर करण्याची मागणी केली जाते.
उदाहरणार्थ, रेल्वे, एसटीमधून प्रवास करताना आधार कार्ड पुरावा म्हणून सादर करता येते.
८. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Provident Fund)
संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
९. पारदर्शकता
आधार कार्डमुळे सेवा आदान-प्रदान करण्यात पारदर्शकता निर्माण झाली आहे. याबरोबरच, सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचे पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात, त्यामुळे मध्यस्ती असलेल्या व्यक्तीकडून लाभार्थ्याची फसवणूक तसेच भ्रष्टाचार होण्याची शक्यता कमी झाली आहे.
याबरोबरच, एलपीजी सबसिडी, नवीन मोबाइल क्रमांक घेण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स, आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) तयार करण्यासाठी आधार क्रमांक महत्त्वाचा आहे, त्यामुळे भारतातील प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड असणे गरजेचे झाले आहे. यामुळे दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोप्या होताना दिसतात.