वृत्तसंस्था, नवी दिल्ली : देशातील घाऊक महागाईचा दर सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात ०.२६ टक्के असा सकारात्मक नोंदविण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने गुरूवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आले. टॉमेटो, कांदा, भाज्यांसह खाद्यवस्तूंच्या किमतवाढीमुळे मागील सात महिन्यांत प्रथमच घाऊक महागाई दराच्या वाढीचा दर शून्याखालील उणे पातळीतून वर आला आहे.

घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक महागाईचा दर ठरविला जातो. मार्च २०२३ नंतर प्रथमच घाऊक महागाईचा दर उणे पातळीखालून वर आलेला आहे. त्या महिन्यांत घाऊक महागाईचा दर १.३४ टक्के होता. हा दर ऑक्टोबर महिन्यात उणे ०.५२ टक्के होता. त्यावेळी तो तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर होता. सप्टेंबर महिन्यात हा दर ०.०७ या पातळीवर होता. आता नोव्हेंबरमध्ये हा दर ०.२६ टक्के नोंदविण्यात आला. खाद्यवस्तूंच्या महागाईत झालेली वाढ ही प्रामुख्याने घाऊक महागाईचा दर वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. खाद्यवस्तूं घटकांची महागाई नोव्हेंबरमध्ये ४.६९ टक्क्यांवर पोहोचली आहे, जी य़ा आधी ऑक्टोबरमध्ये १.०७ टक्के आणि सप्टेंबरमध्ये १.८८ टक्के पातळीवर होती.

हेही वाचा : देशातील ‘ही’ १२ राज्ये कर्ज घेण्यात अव्वल; राजस्थान अन् पश्चिम बंगालच नव्हे, तर ‘या’ राज्यांचाही यादीत समावेश

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खाद्यवस्तू, खनिजे, यंत्रे व उपकरणे, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स व ऑप्टिकल उत्पादने, वाहने, इतर वाहतूक उपकरणे आणि इतर उत्पादने यांच्या किमतीत वाढ झालेली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर उणे पातळीखालून वर आला. प्राथमिक वस्तूंची महागाई १.३० टक्क्यांनी वाढली असून, त्याखालोखाल इंधन व ऊर्जा महागाई ०.७८ टक्के आणि उत्पादित वस्तूंची महागाई ०.०७ टक्क्याने वाढली आहे.

हेही वाचा : Gold-Silver Price on 14 December 2023: सोनं पुन्हा महागलं, पाहा आज किती वाढली किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

किरकोळ महागाईचीही चढती कमान

दरम्यान, किरकोळ किंमत निर्देशांकाच्या आधारित किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबर महिन्यात वाढून ५.५५ टक्क्यांवर पोहोचल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारी स्पष्ट केले. त्याआधीच्या ऑक्टोबर महिन्यात हा दर ४.८७ टक्के होता. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दराचे ४ टक्क्यांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेसाठी सहनशील सहा टक्के मर्यादेच्या आत हा दर राहिला आहे. मात्र, तो सलग ५० महिने ४ टक्क्यांच्या नवनिर्धारीत उद्दिष्टापेक्षा जास्त नोंदविण्यात आला आहे. अर्थात टॉमेटो, कांद्यांचा भाव-भडका पाहता, रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महागाई दरात अकस्मात वाढीचे भाकित महिन्याच्या सुरुवातीला वर्तवले होते.